अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षय आणि योगिताला कन्यारत्न प्राप्त झाला आहे. आज दुपारी त्यांनी ही गोड बातमी दिली. बाळाचा जन्म मुंबईतील दादर येथील नर्सिंगहोम मध्ये झाला आहे. योगिता ही ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांची मुलगी आहे. त्यामुळे अरूण गवळी आजोबा झाले आहेत.
बाबा झाल्यावर प्रतिक्रिया देताना अक्षयच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता, या बाबत बोलताना तो म्हणाला, ‘मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकत नाही. बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरु करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. बाळ आणि योगिता दोघेही सुखरूप आहेत’.
पुढे बोलताना तो म्हणाला की, ‘आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असतानाच या गोड बातमीने हा आनंद द्विगुणित झाला आहे. कुटुंबात नवीन सदस्य येणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. इतकेच नव्हे तर बाळाचे नाव काय ठेवणार अशा प्रश्नांनी भंडावून सोडले आहे.’ अक्षय आणि योगिताला झालेल्या कन्यारत्नाच्या बातमीने चाहत्यांनाही आनंद झाला आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी अक्षयने सोशल मीडिया पोस्टद्वारे लवकरच बाबा होणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्याने योगितासोबतचा फोटो शेअर करत, ‘आयुष्याच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात करतोय. नव्या पाहुण्याच्या आगमानाची वाट पाहात आहे’ अशा आशयाचे कॅप्शन त्याने दिले होते. आता त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे.