अशोक सराफ आणि भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा लहानपणीचा किस्सा अनेकांना माहित नसेल. किंबहुना ही दोन नावं एकत्र ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. लहानपणीचे दिवस, चिखलवाडी आणि सुनील गावस्कर यासंदर्भात अशोक सराफ यांनी काही मजेदार किस्से ‘लोकसत्ता लाईव्ह चॅट’दरम्यान सांगितले.
सुनील गावस्कर यांच्यासोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत अशोक सराफ म्हणाले की, ‘सुनील ज्या इमारतीत राहत होता तो संघ आणि माझ्या इमारतीतील संघ यांमध्ये दर रविवारी क्रिकेटचा सामना रंगायचा. त्याच्यासोबत आम्हीही खेळायचो. खरं तर आम्ही खेळायचो म्हणजे आम्ही नुसते तिथे असायचो, केवळ तोच काय तो क्रिकेट खेळायचा. त्याने बॉल मारला की तो आणायला आम्ही पळत जायचो. तो मारत सुटायचा. त्यावेळीसुद्धा त्याला बाद करणं ही खूप कठीण गोष्ट होती. तेव्हा तो केवळ ८-१० वर्षांचा होता. त्याच्या खेळण्याची, उभं राहण्याची स्टाईल हे आम्ही नुसते बघत बसायचो.’
वाचा : मी चौकटचा नाही बदामचा राजा- अशोक सराफ
नंतर सुनील गावस्कर क्रिकेट क्षेत्राकडे वळले आणि अशोक सराफ नाटकाकडे. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. मात्र आजही त्या आठवणी ताज्या असल्याचे मामा सांगतात. सुनील गावस्कर आणि अशोक सराफ यांनी एकत्र नाटकातसुद्धा काम केलंय. हे ऐकून पुन्हा धक्का बसला ना? खरंय, लहानपणी दोघांनी ‘गुरूदक्षिणा’ या नाटकात काम केलं. हा किस्सा सांगताना अशोक सराफ म्हणाले की, ‘सुनीलसुद्धा एक चांगला नट आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. ‘सावली प्रेमाची’ या चित्रपटात त्याने भूमिकाही साकारली होती. ‘मालामाल’ या हिंदी चित्रपटातही तो पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. लहानपणी आम्ही एकत्र नाटकात काम केलेलं, रेडिओ प्ले एकत्र केलं. ‘गुरुदक्षिणा’ या नाटकात त्याने कृष्ण आणि मी बलरामाची भूमिका साकारली. या नाटकादरम्यानचा फोटो अजूनही त्याच्याकडे आहे.’