TikTok स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांनी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोनाली हरयाणातील हिसार जिल्ह्यातील बाजार समितीच्या सचिवाला चपलेने मारहाण करताना दिसत आहेत. या प्रकरणावर बॉलिवूड चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या कृत्याला सत्तेचा माज म्हणता येईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

आवर्जुन पाहा – सर्वाधिक कमाई करणाऱ्या २० सेलिब्रिटींच्या यादीत केवळ एक भारतीय

अवश्य वाचा – राहुल गांधींवर इतकी टीका का करता?; स्वरा भास्करचा विरोधकांना सवाल

“भाजपा नेता सोनाली फोगटचं हे कृत्य पाहून मला धक्काच बसला. या कृत्याला केवळ सत्तेचा माज म्हणता येईल. सोनालीने पार्टीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. तिचं हे कृत्य आक्षेपार्ह असून तिच्यावर त्वरित कारवाई केली जावी.” अशा आशयाचे ट्विट अशोक पंडित यांनी केलं आहे.
अशोक पंडित नेहमीच सरकारच्या बाजुने प्रतिक्रिया देत असतात. मोदी सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला ते जाहीर समर्थन देतात. या पार्श्वभूमीवर त्यांनी एका भाजपा नेत्याच्या विरोधात केलेलं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे.