सध्याच्या घडीला सर्वच सेलिब्रिटी त्यांच्या आगामी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्यमांचा वापर करतात. चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडिओ शेअर करून सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांना वेळोवेळी त्याविषयीची माहिती देतात. मराठी चित्रपटसृष्टीतील मि. परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अतुल कुलकर्णी सध्या वाराणसी येथे एका चित्रपटाचे शुटिंग करत आहे. तेथील काही फोटो त्याने फेसबुक अकाऊंटवरही शेअर केले.
PHOTOS : हनीमूनसाठी झहीर-सागरिकाची मालदिवला पसंती
अतुलने वाराणसीतील नदीच्या काठाजवळ काढलेला त्याचा एक फोटो नुकताच शेअर केला. पण, या फोटोपेक्षा कॅप्शननेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत अतुल लाइटरने सिगारेट शिलगावताना दिसतो. धुम्रपान हे आरोग्यास हानिकारक असते. त्यामुळे जाहीरपणे धुम्रपान करतानाचे फोटो शेअर करणे टीकेला आमंत्रण देऊ शकते. त्यामुळेच अतुल कुलकर्णीने सावधगिरी म्हणून फोटोसोबत कॅप्शनमध्ये स्पष्टीकरण दिले आहे.
अतुलने लिहिलं की, ‘ वाराणसी शूट !! पल्याडचा किनारा …. हा सीनमधला फोटो आहे. Interesting वाटला म्हणून टाकलाय. धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे हे मला १०० टक्के मान्य आहे. मी स्वतः ते करत नाही आणि प्रोत्साहित पण करत नाही. मला माफ करा पण यानंतरही धुम्रपानाविषयी कमेंट्स आल्या तर त्या डिलिट होतील.’ पण, या फोटोवर आलेल्या प्रतिक्रिया पाहता अतुलला त्या डिलिट कराव्या लागणार नाही असे दिसते. कारण, त्याच्या चाहत्यांचा आपल्या आवडत्या अभिनेत्यावर पूर्ण विश्वास आहे. ‘आम्ही तुम्हाला ओळखतो सर. तुम्ही धुम्रपानाच्या विरोधात आहात हे आम्हाला माहिती आहे’, छान फोटो अशाप्रकारच्या काही प्रतिक्रिया फोटोवर आलेल्या दिसतात.
Year End 2017 Special: बॉलिवूडवर दाक्षिणात्य सिनेमा ठरला डोईजड
अनेकदा सेलिब्रिटींनी शेअर केलेल्या पोस्ट्सचा किंवा फोटोंचा चुकीचा अर्थ काढला जातो. त्यावरून नेटिझन्स सेलिब्रिटींना ट्रोल करतात किंवा त्यांच्यावर टीका करतात. त्यामुळे अतुलने लिहिलेली पोस्ट नक्कीच लक्षवेधी आहे.