|| नीलेश अडसूळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटांमधून चरित्रपट साकारण्याची पद्धत तशी जुनीच आहे. मराठीमध्येदेखील असे अनेक यशस्वी प्रयोग होत आले आहेत. परंतु छोटय़ा पडद्यावरील मालिकांमध्ये क्वचितच चरित्रपट साकारलेले दिसतात. त्यापैकी रमाबाई रानडे आणि महादेव गोविंद रानडे यांच्या जीवनावर आधारलेली ‘उंच माझा झोका’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात असेल. चित्रपट असो मालिका वा नाटक कोणत्याही माध्यमात चरित्रपट साकारणे हे आव्हानच असते. ही आव्हाने लक्षात घेऊनही स्टार प्रवाह या वाहिनीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गौरवगाथा प्रेक्षकांसमोर आणली आहे.

या मालिकेविषयी लेखिका अपर्णा पाडगावकर सांगतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ घटनेचे शिल्पकार आणि पददलितांचे वाली म्हणून समजात रूढ झाले आहेत. परंतु यापलीकडे असलेले एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व समाजातल्या एका मोठय़ा वर्गाने पाहिलेलंच नाही. आपल्याला त्या आकाशाएवढय़ा अथांग व्यक्तिमत्त्वाची थोडीफार ओळख करून देता येईल का, एवढाच विचार डोक्यात होता. त्या दृष्टीने जितके प्रामाणिक प्रयत्न करता येतील, ते करण्याचं ठरवलं आणि काम सुरू केलं. मालिका मोजक्या दोनशे भागांचीच करायची ठरल्याने महत्त्वाचेच ठरावीक प्रसंग निवडणं, ही एक मोठी कसोटी होती. मालिकेत सत्य घटना असतील, याची काळजी घेतानाच कथा म्हणून त्याची मांडणी ललित अंगाने केली आहे. प्रा. हरी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली मालिकेचे लेखन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांनी लिहिलेली ‘शूद्र पूर्वी कोण होते’ किंवा ‘जातिप्रथेचं उच्चाटन’ ही अशी एक-दोन पुस्तकं खूप आधी वाचलेली होती. त्यांचं एक चरित्र वाचलं होतं. मात्र, मालिकेसाठी वैयक्तिक आयुष्याचा लेखाजोखा देणाऱ्या पुस्तकांची गरज होती. त्यातून चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी लिहिलेले बारा खंड वाचनात आले. आणि त्यावर आधारित अशी ही मालिका आकार घेत गेली. या लेखनात अरविंद चांगदेव खैरमोडे, शिल्पा कांबळे, चिन्मय केळकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे, असे त्यांनी सांगितले.

बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची कथा लिहिताना जबाबदारीचे दडपण वाढते, असे सांगतानाच ते केवळ कायदेतज्ज्ञ नव्हे, तर स्वतंत्र भारताच्या जलनीतीचे शिल्पकारही आहेत. द्विभार्या प्रतिबंधक कायदा आणि वारसा हक्काचा कायदा करणाऱ्या बाबासाहेबांनी समस्त भारतीय स्त्रियांना बाळंतपणाची भरपगारी रजा मिळवून दिली आहे. त्यांच्या मागासवर्गीय या शब्दांत सर्व ‘अबल’ समाजघटक होते, त्यात अस्पृश्यांबरोबरच स्त्रिया आणि कामगारवर्गाचाही समावेश होता. आणि या सर्वाच्या भल्याचा विचार त्यांच्या एकूण समाजकारणात दिसतो, असेही पाडगावकर यांनी सांगितले. बाबासाहेब हे कोण्या एका समाजाचे नाहीत तर अखंड भारतवर्षांचे लोकनेते आहेत, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी आणि माझी सगळी टीम करत आहोत, असेही त्या म्हणाल्या.

मालिकेचे दिग्दर्शक गणेश रासने सांगतात, ही केवळ बाबासाहेबांची गौरवगाथा नसून एका सामान्य माणसाची असामान्यत्वाकडे जाण्याची गोष्ट आहे. ती साकारताना स्थळाकाळाचे भान, त्या काळातील परिस्थिती, त्या जाणिवा आणि प्रत्येक पात्रातील जिवंतपणा लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे काम मी करत आहेत. समाजासाठी जीवशिव एक करणाऱ्या माणसाच्या कुटुंबाची ही कहाणी आहे. त्यांनी दिलेला पाठिंबा, सोसलेला अपमान, त्यातून काढलेला मार्ग आणि त्यातून घडलेला महामानव या मालिकेतून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या काळातल्या परिस्थितीत आणि आज फार काही बदल झालेला नाही त्यामुळे अशा माध्यमातून बाबासाहेब घराघरांत पोहचले तर लोकांच्या भूमिका बदलतील, लोक त्यातून प्रेरणा घेतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

विद्रोही गीत आणि जलशांमधून बाबासाहेबांची अनेक गीतं आज प्रसिद्ध झाली आहेत, परंतु सध्या प्रत्येकजण या मालिकेच्या शीर्षकगीताच्या प्रेमात पडला आहे. आदर्श आणि उत्कर्ष शिंदे या दोघांनी मिळून मालिकेचे शीर्षकगीत लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे.  याविषयी बोलताना बाबासाहेबांची गौरवगाथा दीड मिनिटाच्या गाण्यात बसवणे हे सर्वात कठीण काम होते. परंतु वाहिनीकडून पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याने ते गीत आम्हीच लिहिले आणि संगीतबद्ध केले, असे आदर्श यांनी सांगितले.

बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणारा सागर देशमुख सांगतो, बाबासाहेबांवर काहीतरी करावे अशी मालिकेचे निर्माते निनाद आणि नितीन वैद्य यांची इच्छा होतीच. त्यात मी त्या भूमिकेला न्याय देऊ  शकतो या त्यांच्या विश्वासावर मी कामाला सुरुवात केली. परंतु सुरुवातीला प्रचंड दडपण होते. कारण व्यक्ती परिचयाची असली तरी विषय तितकाच खोल होता. या भूमिकेसाठी अभ्यास गरजेचा असला तरी केवळ ज्ञान मिळवून हे साकारता येणे शक्य नव्हते, त्यासाठी मी अधिक जवळ जाऊ न बाबासाहेब जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची अनेक पुस्तके वाचली. मी विधि शाखेत शिकलो असलो तरी कायद्याचा अभ्यास फार मनापासून केला नाही, परंतु आज मालिकेच्या निमित्ताने संविधान समजून घेताना त्यातले अर्थ आणि जाणिवा नव्याने आकलन होत  आहेत. ज्या संघर्षांतून बाबासाहेब आले तो आपल्या आसपासही नाही. आणि तो वाचताना ते जळजळीत वास्तव पाहून धक्का बसला. आणि बाबासाहेब नव्याने उलगडू लागले, असे त्यांनी सांगितले.

नावीन्यपूर्ण आणि तरुणाईला भावतील असे विषय घेऊ न सतीश राजवाडे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. परंतु ही मालिका उभी करण्यात वाहिनीप्रमुख म्हणून त्यांचा मोठा वाटा आहे. मालिकेविषयी सतीश राजवाडे सांगतात, हा विषय करायचाच होता. कारण केवळ त्या व्यथा, जाणीव आणि संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवायचा नव्हता तर त्या संघर्षांतून महामानव कसा घडतो हे जगासमोर आणायचे होते. या संकल्पनेला तीन तासांचा चित्रपट न्याय देऊ  शकत नाही हे लक्षात आल्यामुळे मालिका हे प्रभावी माध्यम निवडले, असे सतीशने सांगितले. हल्ली मुलांचे वाचन कमी झाले आहे, परंतु दृकश्राव्य माध्यमातून बाबासाहेब त्यांच्यासमोर आले तर ते त्यांना जास्त आवडेल. आज अशा माध्यमातून विविध चरित्रपट प्रदर्शित होत आहेत ही स्तुत्य बाब आहे. कारण त्या निमित्ताने लोकांना महापुरुषांचे आयुष्य जाणून घेता येत आहे. मालिकेच्या माध्यमातून घराघरांत बाबासाहेब पोहोचावेत, असा उद्देश होता. त्यांच्या आयुष्यातील राजकीय घडामोडी जगाला माहिती असतील, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बालपणी जो संघर्ष करावा लागला, हे हाल सोसावे लागले ते मात्र पडद्याआड आहेत. आणि तेच दाखवण्यासाठी मालिकेचे कथानक बालपणापासून सुरू होते, असे त्यांनी स्पष्ट के ले. सत्य कथा सांगणे हा एकमेव स्वच्छ उद्देश यामागे आहे. प्रत्येक प्रसंगाला बाबासाहेब तोंड देत राहिले, परंतु ते मागे फिरले अशी एकही घटना त्यांच्या आयुष्यात सापडणार नाही. आणि ही जिद्द, चिकाटी त्या काळात बाळगणाऱ्या या सामान्य माणसाच्या जाणिवा निश्चितच असामान्य होत्या. म्हणून ही कथा नसून शिकण्याची प्रक्रिया आहे. कौटुंबिक नाटय़ाच्या पलीकडे जाऊ न काहीतरी वेगळा आणि ज्ञान देणारा विषय लोकांपुढे मांडता आला याचा आनंद अधिक असल्याचेही सतीश राजवाडे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: B r ambedkar star pravah mpg
Show comments