आमिर खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसारख्या बॉलिवूड स्टार्सनी सीबीएफसीविरोधात राग व्यक्त केला तर दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाला काहीही प्रॉब्लेम नसल्याचे अजय देवगणचे मत आहे. स्त्री-प्रधान सिनेमा असल्यामुळे प्रदर्शनाला केलेला विरोध, सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ‘इंटरकोर्स’ शब्द वापरल्यामुळे त्यावर घेतलेला आक्षेप आणि आगामी सिनेमात ४८ कट्स सांगितल्यामुळे पहलाज निहलानी यांच्याविरोधात अनेकांचाच रोष आहे. पण अजयच्या मते, दिग्दर्शक- निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डासोबत तर्कशुद्ध संवाद केला तर कोणत्याच समस्या येणार नाहीत.

अजयला सीबीएफसीच्या सध्या चालत असलेल्या कारभाराबद्दल विचारले असता तो म्हणाला की, ‘मला खरंच माहित नाही.. ज्या सिनेमांची मी निर्मिती केली आणि सेन्सॉर बोर्डाकडे पाठवले त्यापैकी एकाही सिनेमासाठी मला त्रास झाला नाही. मला नाही वाटत बोर्डाची काही समस्या आहे. तुम्ही जर त्यांच्यासोबत तर्कशुद्ध संवाद साधला तर कोणतीच समस्या येणार नाही.’

दरम्यान, नुकताच ‘बादशाहो’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मिलन लुथरिया दिग्दर्शित या सिनेमात अजय देवगणसोबत इम्रान हाश्मी, इलियाना डिक्रुझ, इशा गुप्ता आणि विद्युत जामवाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. १९७५ मधील आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. १९७५ मधील आणीबाणीदरम्यान सोन्याने भरलेला ट्रक लुटणाऱ्या सहाजणांची कथा या सिनेमात मांडलेली आहे. ट्रेलरमध्ये पुरुषांसोबतच महिलांचेही अॅक्शन सीन्स पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे सिनेमात सनी लिओनी एका आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. १ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

‘बादशाहो’ सिनेमासाठी अजय देवगण, इम्रान हाश्मी आणि मिलन लुथरिया दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलंय. त्यांच्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तेव्हा आता त्यांच्या या त्रिकूटाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांवर होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader