बॉलिवूड अभिनेत्री विविध कारणांनी चर्चेत असतात ही बाब काही नवीन नाही. गेल्या काही दिवसांपासून अशीच एक अभिनेत्री बरीच चर्चेत आहे, ती म्हणजे इशा गुप्ता. बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या इशा गुप्ताच्या बोल्ड फोटोशूटची प्रचंड चर्चा रंगली आहे. मात्र, दुसरीकडे या फोटोतील ‘बोल्डनेस’मुळे तिला टीकेचा सामानाही करावा लागतोय. अनेकजण यावरून तिची खिल्ली उडवत आहेत. मात्र, या सगळ्याकडे दुर्लक्ष करत इशाने सोशल मीडियावर तिचे स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करणे सुरूच ठेवले आहे.

बोल्ड फोटो, सोशल मीडियावर येणाऱ्या कमेंट्स आणि एकंदर आपल्याविषयी लोकांच्या मनात तयार झालेली मतं याविषयी इशाने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना तिची भूमिका स्पष्ट केली. याविषयी मत मांडताना मिश्किलपणे हसत इशा म्हणाली, ‘त्या फोटोंवर येणाऱ्या कमेंट्स पाहून मला लोकांच्या मानसिकतेचा अंदाज आला. पण, माध्यमांनी मला दिलेल्या पाठिंब्यामुळे मला दिलासा मिळाला. त्यांचा पाठिंबा पाहून एकंदर समाजाला बदलण्यासाठी माध्यमांची असणारी तळमळही मला जाणवली. त्यामुळे मी मनापासून त्यांचे आभार मानते.’

‘ते’ बोल्ड फोटोशूट हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दाशियाँपासून प्रेरित होऊन करण्यात आले होते का, असा प्रश्न विचारला असता या गोष्टीला स्पष्ट नकार देत ती म्हणाली, ‘किम कार्दाशियाँने प्रसिद्ध होण्यासाठी वेगळाच मार्ग निवडला होता. पण, मी तसं काहीच केलं नव्हतं.’ इशाच्या या स्पष्टीकरणाचा रोख किमच्या न्यूड फोटोशूटकडे होता. मी तिच्यासारखं काहीच केलं नाहीये, या भूमिकेवर इशा ठाम आहे.

वाचा : … आणि त्या प्रसंगानंतर राखी-गुलजार यांच्यातील नात्याचं समीकरणच बदललं

दरम्यान, हे फोटो पोस्ट करताना अशा प्रकारच्या कमेंट्सचा सामना करावा लागेल, असा किंचित अंदाजही नसल्याचं तिने सांगितलं. ‘फोटोग्राफरकडून मला फोटो मिळताच, मी ते पोस्ट केले. कारण ते मला फार आवडले होते. त्याविषयी इतरांच्या काय प्रतिक्रिया असतील याचा मी विचारही केला नव्हता. किंबहुना माझ्या पीआरलासुद्धा याबद्दल काहीच कल्पना नव्हती’, असं इशा म्हणाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोशूटमुळे इशा गुप्ता प्रकाशझोतात आली. इशाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बादशाहो’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. मीलन लुथारिया दिग्दर्शित या चित्रपटात ती एका गँगस्टरच्या भूमिकेत असून, परवीन बाबी आणि झिनत अमान यांच्या भूमिकेपासूनच तिची व्यक्तिरेखा रंगवण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. पण, तसं काहीच नसून माझी व्यक्तिरेखा फार वेगळी आहे असं तिने स्पष्ट केलं.