टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांची मुख्य भूमिका असलेला ‘बागी २’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर जोरदार कमाई करत आहे. पहिल्याच दिवशी कमाईचे रेकॉर्ड मोडणाऱ्या या चित्रपटाने तीन दिवसांत ७३.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या ‘पद्मावत’ने पहिल्या आठवड्यात ११० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘बागी २’ ने शुक्रवारी भारतात २५.१० कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा हा या वर्षातला आतापर्यंतचा पहिलाच चित्रपट ठरला आहे. शनिवारी २०.४० कोटी आणि रविवारी २७.६० कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एकूण ७३.१० कोटींचा गल्ला जमवला आहे.

वाचा : कतरिनाच्या बहिणीला सलमान म्हणणार ‘ओss ओss जाने जाना’

अहमद खान दिग्दर्शित या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकींगसुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यामुळे पहिल्या आठवड्यात चांगली कमाई करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हा अंदाज आता खरा ठरला आहे.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागी’ या सिनेमाचा हा सिक्वल आहे. ‘बागी’मध्ये टायगर आणि श्रद्धा कपूर ही जोडी पाहायला मिळाली. पण ‘बागी २’ मध्ये बॉलिवूडची बहुचर्चित दिशा- टायगरची जोडी पाहायला मिळत आहे. एकीकडे या दोघांची केमिस्ट्री, टायगरचा अॅक्शन अवतार, भरपूर साहसदृश्ये या सर्व गोष्टींमुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. भारतात ३५००, तर परदेशात ६२५ अशा एकूण ४१२५ स्क्रीनवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे.