सध्या रजनीकांत त्यांच्या ‘काला’ सिनेमामुळे आणि राजकारणातील त्यांच्या एण्ट्रीमुळे चर्चेत आले आहेत. लवकरच रजनीकांत राजकारणातही प्रवेश करणार आहेत. या सगळ्यात आता बाहुबली स्टार कटप्पा अर्थात अभिनेते सत्यराज यांनी रजनीकांत यांच्यावर निशाणा साधला आहे.
एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सत्यराज म्हणाले की, ‘हा सगळा फक्त एक व्यवसाय आहे. एक खरा नेता तो असतो जो अन्याया विरुद्ध उभा राहतो. पण काही लोक मात्र राजकारणाकडे एक व्यवसाय म्हणून पाहतात आणि याला आध्यात्मिक राजकारण असं नावही देतात.’

कटप्पा

काही दिवसांपूर्वी रजनीकांत हिमालय दौऱ्यावर होते. याचाच संदर्भ देत सत्यराज पुढे म्हणाले की, ‘त्याचा आमच्याशी काय संबंध? शांततेसाठी आम्ही हिमालयात जातो का? आमचं शिक्षण पेरियार इथे झालंय, त्यामुळे मी पहिल्यापासूनच शांत ठिकाणी आहे. मला कुठेही जायची गरज नाही. सकाळी उठल्यावर मी ब्रश करतो, शेविंग करतो तेव्हा माझ्या अवती भवती शांततेचं वातावरण असतं. एवढंच काय इडली खातानाही शांतपणे खातो.’

rajinikanth
रजनीकांत

कटप्पाच्या या वक्तव्यावरुन हे स्पष्ट जाणवते की रजनीकांत यांचा राजकारणातील प्रवेश सत्यराज यांना फारसा पटलेला नाही. ‘बाहुबली- २’ सिनेमाच्या प्रदर्शनावेळी कावेरी नदी प्रकरणात सत्यराज यांनी कर्नाटकविरोधी विधान केल्यामुळे सिनेमा अडचणीत आला होता. मात्र सत्यराज यांनी माफी मागितल्यानंतर सिनेमावरची बंदी उठवली गेली होती.

दरम्यान सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित ‘काला’ हा सिनेमा उद्या (गुरुवार) प्रदर्शित होत आहे. मात्र, कर्नाटकात याच्या प्रदर्शनाला अजूनही विरोध होत आहे. अखेर रजनीकांत यांनी स्वत: कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी यांच्याकडे विनंती केली आहे. ज्या चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल तिथे सुरक्षा पुरवण्याची विनंती त्यांनी केली आहे. कावेरी पाणी वाटपाच्या प्रश्नावरून रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरूनच ‘काला’ सिनेमाला विरोध होत आहे.