एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या चित्रपटाने केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. कटप्पाने बाहुबली का मारले? या एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांच्या रांगाच्या रांगा चित्रपटगृहाबाहेर लागलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. केवळ एकाच भाषेपुरता हा चित्रपट मर्यादित न राहता तेलगु, तमिळ आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. याचेच परिणाम आपल्याला बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाले. या चित्रपटाने तब्बल १६०० कोटी रुपयांच्यावर कमाई केली आहे. असा हा चित्रपट मराठीत आला तर ….

वाचा : जून महिन्यात पेटणार या चित्रपटांची ‘ट्युबलाइट’

अजूनतरी कोणत्याही दिग्दर्शकाने ‘बाहुबली’ मराठीत आणण्याचा विचार व्यक्त केलेला नाही. पण, मराठी सेलिब्रेटींच्या चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांना ‘बाहुबली’ चित्रपटात बघण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळेच काही चाहत्यांनी मराठी कलाकारांना बाहुबलीमधील पात्रांचा टच दिला आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्याला मराठीतील बाहुबली सापडला होता. अभिनेता प्रसाद ओकने बाहुबलीच्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. बाहुबलीनंतंर आता आम्हाला मराठीतील देवसेनादेखील सापडली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णीबद्दल आम्ही बोलतोय. चाहत्यांनी तिचे देवसेनेच्या लूकमधील फोटो ट्विट केले असून सोनालीने ते रिट्विट केले आहेत. त्यामुळे सोनालीदेखील हे फोटो पाहून भलतीच खूश झाल्याचे तिच्या ट्विटमधून दिसून येते.

काही दिवसांपूर्वीच प्रसाद ओकने ‘बाहुबली २’ पाहिल्यानंतर त्याच्यावर चित्रपटाचा परिणाम कसा झाला हे ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केले होते. त्यासाठी त्याने स्वतःच बाहुबलीचा फोटो एडिट करू तेथे त्याचा फोटो लावला होता. हा फोटो पाहताना यातला प्रसाद कोण आणि प्रभास कोण हाच प्रश्न अनेकांना तेव्हा पडला होता.

मराठीत ‘बाहुबली’ चित्रपट आल्यास तुम्हाला बाहुबली, देवसेना, कटप्पा, शिवगामी देवी, भल्लाल देव या व्यक्तिरेखांमध्ये कोणत्या कलाकाराला पाहायला आवडेल ते खालील प्रतिक्रिया बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.