लोकप्रियतेची सर्वोच्च पातळी गाठणाऱ्या बाहुबली या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रशंसा मिळवली आहे. अनेक हॉलीवूड सेलेब्रिटींनी बाहुबलीचे तोंड भरून कौतुक कोले. पण जेव्हा चित्रपटातील एखादी व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय होते तेव्हा प्रेक्षक त्याची तुलना इतर लोकप्रिय व्यक्तिरेखेशी करू लागतात. आणि त्याचप्रमाणे आता बाहुबलीची तुलना बॅटमॅनशी होऊ लागली आहे.जर बाहुबली आणि बॅटमॅन यांच्यात युद्ध झाले तर कोण जिंकेल, हा प्रश्न सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जगभरातील चाहते यावर आपापली मते नोंदवत असून काहींच्या मते बाहुबली बॅटमॅनपेक्षा श्रेष्ठ आहे. तर काहींच्या मते बॅटमॅनचे आव्हान पेलण्याचे बळ बाहुबलीत नाही. या वादविवाद स्पर्धेत आता हॉलीवूड सेलेब्रिटींनीही उडी घेतली आहे.हॉलीवूड सेलेब्रिटी जॉर्ज आर आर मार्टिन यांनीही बाहुबली विरुद्ध बॅटमॅन युद्धावर आपले मत नोंदवले. त्यांच्या मते बाहुबली आणि बॅटमॅन या दोघांत काही विशेष फरक नाही. दोन्ही सुपरहिरो हिंमत, कर्तृत्व, महत्त्वाकांक्षा आणि युद्ध करण्याची अनोखी शैली यासाठी ओळखले जातात. बाहुबली उंचच उंच दऱ्या, डोंगर, झाडे अगदी सहज पार करतो. त्याचप्रमाणे बॅटमॅनही उंच इमारती आणि मोठे ब्रिज सहज पार करतो. दोघेही धनुर्विद्या आणि तलवार चालवण्यात तरबेज आहेत. दोघांची वेशभूषा आणि व्यक्तिरेखेचा काळ वगळता काही विशेष फरक नाही.पण दोघेही समोर आले आणि त्यांच्यात युद्ध झालेच तर काय होईल? यावर जॉर्ज यांनी व्यक्त केलेले मत कदाचित बाहुबली चाहत्यांना रुचणार नाही. त्यांच्यामते बॅटमॅनचे आव्हान बाहुबलीला पेलणे शक्य होणार नाही. कोणताही मोठा योद्धा त्याचे शस्त्र आणि त्यावरील नियंत्रण यासाठी ओळखला जातो. बाहुबलीकडे असे कोणतेही विशेष शस्त्र नाही. शिवाय बॅटमॅनचे प्लॉट आर्मर बाहुबलीच्या शस्त्रांपेक्षा अत्याधुनिक आहे. पण दोघांनी शस्त्रांशिवाय युद्ध केले तर सामना टक्करचा होईल. कारण बाहुबलीत हत्तीची ताकद आणि वाघाची चपळता आहे. पण बॅटमॅनही काही कमी नाही, त्याच्याकडे आयर्नमॅनप्रमाणे तंत्रज्ञान किंवा सुपरमॅनप्रमाणे सुपर नॅचरल पॉवर नसली तरी तो एक निंजा आहे. उत्कृष्ट युद्धकौशल्य त्याच्याकडे आहे आणि त्याच्या जोरावर तो बाहुबलीचा सामना सहज करू शकतो. या उत्तरावर अनेक बाहुबली चाहते नाराज झाले असून बाहुबलीच कसा बॅटमॅनपेक्षा वरचढ आहे हे मार्टिन यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
बाहुबली विरुद्ध बॅटमॅन..
बॅटमॅनचे आव्हान पेलण्याचे बळ बाहुबलीत नाही.
Written by मंदार गुरव
Updated:
First published on: 11-06-2017 at 04:17 IST
TOPICSमंदार गुरव
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baahubali vs batman hollywood katta part