एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या सुपरहिट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले होते. या चित्रपटाने रचलेले काही विक्रम अजूनही कोणत्याच चित्रपटाला मोडता आलेले नाही. आता दोन जबरदस्त अॅक्शन हिरो एकत्र असलेला ‘वॉर’ हा चित्रपट ‘बाहुबली २’ला आव्हान देत असल्याचं दिसत आहे. कारण अवघ्या सात दिवसांत हृतिक रोशन व टायगरची श्रॉफची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. तर दुसरीकडे ‘बाहुबली २’चा दहा दिवसांत ३०० कोटींच्या कमाईचा विक्रम आहे. आता तीन दिवसांत ‘वॉर’ १०० कोटी कमावून हा विक्रम मोडीत काढणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरवर या वर्षांतील सर्वांधिक कमाईच्या चित्रपटांची नावे सांगितली आहेत. त्यातही २०० कोटींचा आकडा सर्वांत आधी गाठणारा चित्रपट ‘वॉर’ आहे.

२०० कोटी रुपयांचा गल्ला कमीतकमी दिवसांत जमवणारे चित्रपट-
वॉर- सात दिवसांत २०० कोटी
कबीर सिंग- १३ दिवसांत २०० कोटी
भारत- १४ दिवसांत २०० कोटी
उरी: द सर्जिकल स्ट्राइक- २८ दिवसांत २०० कोटी
मिशन मंगल- २९ दिवसांत २०० कोटी

वरील हे सर्व चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेले आहेत. तर ‘वॉर’सोबतच ‘संजू’, ‘सुलतान’, ‘दंगल’, ‘पीके’, ‘बजरंगी भाईजान’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांनीसुद्धा सातव्याच दिवशी २०० कोटी रुपयांची कमाई केली होती.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘वॉर’ चित्रपटात हृतिक आणि टायगर यांचे एकत्र नृत्यकौशल्य आणि युद्धकौशल्य अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या पंधरा मिनिटांपर्यंत या दोघांमध्ये अत्यंत शैलीदार हाणामारी पाहायला मिळते.