रेश्मा राईकवार
‘बाबो’
किशोर कदम, सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, विजय निकम इतकी मोठी, अनुभवी आणि प्रसिद्ध कलाकारांची नावे एका चित्रपटात एकत्र आली असतील तर निश्चितच प्रेक्षकांसाठी ती पर्वणी असते. पण अर्थात इतक्या मोठय़ा कलाकारांना घेऊन त्यांना देण्यासारखेच तुमच्याकडे काहीच नसेल तर पडद्यावर मनोरंजनाच्या नावाखाली जे कडबोळे दिसते ते पाहून ‘बाऽऽबो.. काय करून राहिले हो हे..’ अशीच अवस्था होते. गावातील दोन प्रेमी जीवांचे मीलन घडवून आणण्याच्या निमित्ताने जो काय घाट घातला जातो आणि त्या घुसळणीतून ‘कुणाचे काय तर कुणाचे काय’ बाहेर पडते. एरव्ही ही संकल्पना खरेच चांगल्या अर्थाने फुलवता आली असतीही, पण अजूनही गावातील मानसिकता बाई, बाटली आणि पैसा याचभोवती फक्त फिरते. तिथे दुसरे काहीच घडत नाही, यावर दृढ विश्वास असल्याने विषय कितीही चांगले आले तरी ते त्याच साच्यातून उतरतात.
कुठल्या तरी गावातील (इथे नावाचा-प्रदेशाचा विचार करूनही काही फरक पडणार नाही) मुन्नी (प्रतीक्षा मुणगेकर) ही एकच सुंदर मुलगी सगळ्या गावाला घायाळ करते आहे. मात्र या मुन्नीचा जीव अडकतो तो बबलूमध्ये (अमोल कागणे). बबलू कुठलीशी हार्डवेअर इंजिनीअरिंगची पदवी घेऊन आला आहे, असे हा चित्रपट सांगतो. बाकी तो कोणत्याही मुलीकडे बघत नाही, मात्र मुन्नीला तो थेट आय लव्ह यू म्हणून मोकळा होतो. या कुठल्याच गोष्टीला कशाचाच आधार नाही, पण तरीही या दोघांची प्रेमकथा वेगळी आहे. बबलूने मुन्नीला मिठी मारली या गोष्टीचा गावात बभ्रा होतो. त्यामुळे वरच्या आळीत राहणारे मुन्नीचे वडील आबा (सयाजी शिंदे) जे गावचे तलाठी आहेत आणि खालच्या आळीतील बबलूचे वडील तात्या (किशोर कदम) पेटून उठतात. या दोन्ही आळ्यांमध्ये गाव वाटले गेले असून त्यांच्यात वर्षांनुवर्षे भांडण आहे. बबलू आणि मुन्नीच्या प्रेमकथेमुळे गावात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. आता हे दोघे सोडून क थेत आणखी तिसरे पात्र आहे ते खुद्द दिग्दर्शक रमेश चौधरी यांनी साकारले आहे. या पात्राची गोष्टीतील रचना ही फक्त अठ्ठावीस वर्षे थांबून राहिलो आहे. इतक्या वर्षांनी लग्न झाले, आता तरी होऊन जाऊ द्यात, इतकेच म्हणण्यासाठी केलेली आहे. उपहास म्हणून किंवा मूर्खपणा दाखवण्यासाठी म्हणून जरी या विनोदाची निर्मिती करायची असा विचार दिग्दर्शकाने केला असला तरीही यातल्या अनेक व्यक्तिरेखा, त्यांचे पडद्यावर असणे आणि उमटणे दोन्ही अर्थहीन आहेत. तर असो.. या दोघांचे लग्न होते का? गाव एकत्र येते का? गावातला गोंधळ कसा असतो हे सांगायचे आहे का? यातल्या कुठल्याच गोष्टीचा नेमका पत्ता लागत नाही.
रमेश चौधरी यांचा दिग्दर्शक म्हणून ‘बाबो’ हा पहिलाच प्रयत्न आहे. याआधी त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्यामुळे चित्रपटाची तांत्रिक बाजू बरी आहे. मात्र प्रत्येक विनोदी प्रसंगाला काही तरी वेगळे संगीत देण्याचा प्रयत्न, पाचकळ विनोदांची पेरणी, नव्या फळीतील कलाकारांचा जेमेतेमे अभिनय या सगळ्यामुळे ‘बाबो’ एका मर्यादेपलीकडे वर उठतच नाही. गावातल्या गावात केवळ व्यक्ती आणि घरे बदलतात. सगळ्याच गावक ऱ्यांची मन:स्थिती सारखी असते जणू.. एका गावाच्या बारा भानगडी असूच शकतात, पण इथे ‘भानगडी’चाही एकच अर्थ आहे. त्यामुळे इतके ताकदीचे कलाकार असूनही त्यांना देण्यासाठी उत्तम कथा, पटकथाच नाही हे सातत्याने चित्रपट पाहताना जाणवत राहते.
सयाजी शिंदे यांनी आपल्या सहजशैलीत आबाची व्यक्तिरेखा साकारली आहे. तात्यांच्या भूमिकेसाठी किशोर कदम यांनी नेहमीपेक्षा काहीएक वेगळा हेल पकडण्याचा प्रयत्न केला आहे. डोक्यावर पडला आहे की काय.. असे वाटायला लावणारा त्यांचा तात्या बऱ्यापैकी जमला आहे. या दोघांमधील जुगलबंदी जरी केंद्रस्थानी ठेवली असती तरी चित्रपटात दाखवण्यासाठी खूप मसाला मिळाला असता. भारत गणेशपुरे तर चित्रपटात नाहीच आहेत, असे म्हणणे योग्य ठरेल. अरविंद जगताप यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. गावातील व्यक्तिरेखा, त्यांचे बारकावे काही प्रमाणात अचूकपणे पकडायचा प्रयत्न जगताप यांनी केला आहे. मात्र वर म्हटल्याप्रमाणे जगात संकट कोसळले तरी चालेल, मृत्यू समोर दिसत असला तरी चालेल आमच्या उडय़ा ‘शेवटची दारू पिऊन मरू’ नाही तर ‘शेवटचे आजच्या रात्रीचे उरकून घेऊ’ असे विनोदाने का होईना म्हणण्याइतपतच आहे, यापलीकडे त्यातून फारसा काही अर्थबोध होत नाही. त्यामुळे कथा आणि त्याहूनही दिग्दर्शनातील ठोकळेबाजपणा आणखीनच चित्रपटाला कमकुवत करून टाकतो. मनोरंजन म्हणून पाहायचे ठरवले तरी ‘बाबो’ निखळ मनोरंजनही करत नाही.
* दिग्दर्शक – रमेश चौधरी
* कलाकार – सयाजी शिंदे, किशोर कदम, भारत गणेशपुरे, विजय निकम, अमोल कागणे, प्रतीक्षा मुणगेकर, रमेश चौधरी.