भारत- पाकिस्तान सीमेवरील तणावपूर्ण परिस्थिती पाहता पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. आगामी बॉलिवूड चित्रपटात राहत फतेह अली खान यांनी गायलेलं गाणं काढून टाकत पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी केली आहे. ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ या चित्रपटात राहत यांनी गाणं गायलं असून आता त्याऐवजी दुसऱ्या भारतीय गायकाच्या आवाजात नव्याने गाणं रेकॉर्ड करण्याची मागणी त्यांनी केली आहे. भारत- पाकिस्तान सीमेवर इतकी तणावपूर्ण परिस्थिती असताना मनोरंजनासाठी पाकिस्तानी कलाकारांना प्राधान्य देण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

‘मी चित्रपट निर्मात्यांना विनंती करतो की राहत फतेह अली खान यांनी गायलेलं गाणं काढून टाकावं आणि त्याऐवजी दुसऱ्या गायकाकडून ते गाणं रेकॉर्ड करून घ्यावं. अरिजीत सिंगसारखा सर्वोत्तम गायक आपल्याकडे असताना ‘दिल दिया गल्लाँ’ हे गाणं आतिफ अस्लमकडून रेकॉर्ड करून घेण्याची काय गरज होती? एकीकडे वृत्तवाहिन्यांवर आपले जवान शहीद होत असल्याच्या बातम्या येत असतात, तर दुसरीकडे एफएमवर पाकिस्तानी गायकांनी गायलेली गाणी ऐकवली जातात,’ अशा शब्दांत सुप्रियो यांनी संताप व्यक्त केला.

‘आतिफ आणि राहत हे खूप चांगले गायक आहेत. परंतु, हे स्पष्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे की आमची तक्रार या गायकांशी नसून त्यांच्या पाकिस्तानी नागरिकत्वाशी आहे,’ असे म्हणत ही राजकीय भूमिका नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीबाबत पाकिस्तानी कलाकार का गप्प आहेत, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.