सिनेमा- बघतोस काय मुजरा कर
कलाकार- जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसाळे, पर्ण पेठे, नेहा जोशी, रसिका सुनील, अश्विनी काळसेकर, विक्रम गोखले, अनंत जोग
दिग्दर्शक- हेमंत ढोमे

महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे करण्यासाठी अनेक गड किल्ले बांधले आणि जिंकले. या सर्व गड किल्ल्यांचे महत्त्व अनेक तरुणांना हेमंत ढोमे लिखित-दिग्दर्शित ‘बघतोस काय मुजरा कर’ या सिनेमाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गड किल्ले हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. पण महाराज्यांच्या किल्ल्यांची झालेली दुर्दशा, नागरिकांमध्ये असलेली अनास्था तसेच राजकारण्यांनी सत्तेसाठी महाराजांना एक ब्रॅण्ड म्हणूनच उभे केले आहे या सर्व विषयांवर बघतोस काय.. भाष्य करतो.

अरबी समुद्रात कित्येक कोटी घालून जो महाराजांचा पुतळा उभा करण्यात येणार आहे, त्यापेक्षा त्यातला निम्मा पैसा जरी महाराजांनी बांधलेल्या गड किल्यांच्या संवर्धनासाठी वापरला तर त्यातून अनेक प्रश्न सुटतील हा विषय या सिनेमात अनोख्या पद्धतीने मांडण्यात आला आहे.
या सिनेमात खरबुजेवाडी नावाचे गाव दाखण्यात आले आहे. महाराजांच्या काळात या गावातले अनेक मावळे शिवाजी महाराजांच्या सेवेत होते. त्यामुळे या गावात सगळेच शिवभक्त असतात. पण त्यातही नानासाहेब देशमुख (जितेंद्र जोशी), पांडुरंग शिंदे (अनिकेत विश्वासराव), शिवराज वहाडणे (अक्षय टंकसाळे) या तीन मित्रांना शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन आणि पर्यायाने गावाचा विकास करण्याची इच्छा असते. पण सत्तेवर असलेल्या नेत्यांमुळे ते त्यांना शक्य होत नसते.

पण महाराजांसाठी काही तरी करण्याच्या इच्छेने हे तीनही मावळे पेटून उठतात आणि इंग्लंडमधून महाराजांची तलवार चोरुन आणण्याचा बेत आखतात. त्यासाठी ते घरातल्या घरात तयारीही करतात. हा प्रसंग विनोदी पद्धतीने दाखविण्यात आला असला तरी, सद्य परिस्थितीत इंग्लंडच्या राणीच्या घरात जाऊन सहज तलवार सहज चोरुन आणता येईल असा विचार करणारे आणि तशी कृती करणारे कोणी असेल का हा मूळ प्रश्न उपस्थित होतो. तसेच प्रेक्षकांनाही हे दृश्य बघताना आपण नक्की काय बघतो हेही वाटून जाते. त्यामुळे भाबडा शिवभक्त दाखवण्याच्या प्रयत्नात हा प्रसंग फसल्यासारखेच वाटते. याशिवाय, नेहा जोशी, रसिका सुनील यांच्या वाट्याला काहीच भूमिका आल्या नसल्याचे दिसते.

जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव यांच्या अभिनयातही नाविन्य दिसत नाही. या सिनेमाचा विषय मजबूत असला तरी आपण काही विलक्षण बघत आहोत अशी जाणीव अजिबात होत नाही. गड, किल्ले, पुतळे यांच्याबाबत अनेक गोष्टी आपल्याला माहीत असतात पण तरीही त्याबद्दल काही करावे असे कोणाला वाटत नाही. नेमका हाच मुद्दा या सिनेमात प्रामुख्याने मांडण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांची भूमिकाही अश्विनी काळसेकर यांनी चांगली साकारली आहे. तसेच विरोधी पक्ष नेते म्हणून विक्रम गोखलेही साजेसे वाटतात.

आतापर्यंत हेमंत ढोमेने नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केले आहे. ‘पोश्टर गर्ल’ या सिनेमाचे लेखनही त्याने केले होते. दिग्दर्शनाचा हा त्याचा पहिलाच अनुभव आहे. पहिल्या अनुभवामध्ये त्याचे कौतुक करायला हवे. संगीतकार अमितराज याने या सिनेमाला संगीत दिले आहे. पण या सिनेमातले एकही गाणे चित्रपटगृहातून बाहेर पडताना लक्षात राहते असे नाही. त्यामुळे फक्त सिनेमाच्या विषयाकडे बघूनच प्रेक्षक या सिनेमाकडे वळू शकतात.

– मधुरा नेरुरकर

Twitter: @MadhuraNerurkar
madhura.nerurkar@indianexpress.com