‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबती लवकरच टेलिव्हिजनच्या विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय. एस. एस. राजामौली दिग्दर्शित चित्रपटामध्ये खलनायकी भूमिका साकारल्यानंतर राणाच्या चाहत्यांचा आकडाही वाढल्याचं पाहायला मिळालं. प्रचंड गाजलेल्या खलनायकी भूमिकेनंतर हा अभिनेता आता ‘नंबर वन यारी विथ राणा’ या कार्यक्रमातून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करत आहे. या कार्यक्रमाचा टीझर त्याने नुकताच आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘तुमच्या आवडत्या कलाकारांसोबत मैत्रीचा आनंद घ्यायला तुमच्या घरी येतोय’ असं ट्विटदेखील त्याने केलंय.

हा एक चॅट शो असेल ज्यामध्ये राणा चित्रपटसृष्टीतील आपल्या कलाकार मित्रमंडळींना बोलावून त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारणार आहे. ‘नंबर वन यारी विथ राणा’ हा कार्यक्रम जेमिनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. राणाचे चाहते त्याला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी खूपच उत्सुक असून ट्विटरवर राणाला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देत आहेत.

वाचा : ४४ वर्षांचा अनुराग कश्यप २३ वर्षांच्या मुलीला करतोय डेट 

सध्या राणा आपल्या आगामी ‘नेने राजू, नेने मंत्री’ या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘बाहुबली’मध्ये जरी राणाच्या रुपातील खलनायक पाहायला मिळाला असला तरीही या आगामी चित्रपटात मात्र तो जनसमुदायाच्या नेत्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता.