बॉलिवूडमध्ये हिट ठरत असलेली जोडी म्हणजे भूमि पेडणेकर आणि आयुष्मान खुराना यांचा ‘बाला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘दम लगा के हैशा’ आणि ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटांमधील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. विशेष म्हणजे या चित्रपटांप्रमाणेच ‘बाला’मधील त्यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना भावली. ऐन तारुण्यात केस गळत असल्यामुळे आपल्याच आसपासचे लोक जेव्हा खिल्ली उडवतात त्यावेळी अशा तरुणांची नेमकी अवस्था कशी असेल हे ‘बाला’ या चित्रपटातून पडद्यावर साकारण्यात आलं. आयुष्मान खुराना याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातून समाजाला केवळ एक संदेशच दिला नाही तर प्रेक्षकांनाही खळखळून हसविलं.

चित्रपट निर्माते दिनेश विजन आणि दिग्दर्शक अमर कौशिक ‘बाला’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले. ‘स्त्री’ या चित्रपटानंतर त्यांनी पुन्हा एकदा ‘बाला’ या चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना, भूमि पेडणेकर आणि यामी गौतम हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

कानपूरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबातील बालमुकुंद (आयुष्मान खुराना) अर्थात ‘बाला’ हा लहानपणी लांब केस आणि जबरदस्त अॅटीट्युडमुळे ओळखला जाई. इतकंच नाही तर तो लहानपणी त्याच्या केसांमुळे प्रचंड चर्चेत असे. त्यामुळेच तो अनेक वेळा प्रत्येकाची खिल्ली उडवत असे. मात्र त्याच्या नशीबाचे फासे असे उलटले की तो ऐन तारुण्यामध्ये केसगळतीमुळे त्रस्त झाला. उत्तर प्रदेशमधील कानपूर आणि लखनौच्या प्रादेशिक भाषेमध्ये या चित्रपटाची सुरुवात होते. बालाचे वयाच्या २५ व्या वर्षीच केस गळू लागतात. अकाली केसगळती होत असल्यामुळे तो २०० पेक्षा जास्त उपाय करुन पाहतो. मात्र परिणाम काहीच होत नाही. त्यामुळे कालांतराने त्याला विगचा वापर करावा. मात्र हे विग लावल्यानंतर त्याची मैत्रीण लतिका त्रिवेदी( भूमि पेडणेकर) कायम चिडवत असते. याचदरम्यान त्याची ओळख परी मिश्रा( यामी गौतम) हीच्याशी होते. विशेष म्हणजे परीचे केस प्रचंड सुंदर असतात. ज्यावेळी बाला, परी आणि लतिका यांची भेट होते. तेव्हा खऱ्या अर्थाने या चित्रपटाची रंगत वाढते.मात्र चित्रपटामध्ये नेमकं काय होतं हे चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना कळणार आहे.

वाचा : Photo : ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीने केलं बाथटबमध्ये टॉपलेस फोटोशूट

या चित्रपटामध्ये बऱ्याच ठिकाणी कानपुरी भाषा आणि तिचा लहेजा अनुभवायला मिळतो. त्याचप्रमाणे या चित्रपटाची करण्यात आलेली मांडणी आणि दिग्दर्शन यामुळे प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा खिळून राहतात. आयुष्मानप्रमाणेच अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि यामी गौतम यांचाही अभिनय पाहण्याजोगा आहे. त्यांच्यासोबतच सौरभ शुक्ला, जावेद जाफरी,सीमा पाहवा आणि अन्य कलाकारांनीही त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. त्यासोबतच चित्रपटातील संवाद, स्क्रीन प्ले, संगीत आणि कलाकारांचा अभिनय पाहण्याजोगा आहे.

 

स्टार : तीन

Story img Loader