‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे’ असं म्हणतात. प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी मार्गदर्शनाची आणि पाठींब्याची आवश्यकता भासते. विशेषत: संकटकाळी काय करावे, कोणता निर्णय घ्यावा असा प्रश्न बऱ्याचदा पडतो. महाराष्ट्रात थोर संत होऊन गेले ज्यांनी सर्वसामान्य लोकांना भक्तिमार्ग दाखवला. ज्यांच्या शक्तीचा प्रत्यय त्यांच्या सत्कर्मातून लोकांना आला, ज्यांनी गरजू लोकांना जवळ केलं, त्यांची मदत केली, भरकटलेल्यांना मार्ग दाखविले. परोपकारार्थ आणि भक्तांचं कल्याण करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेल्या ‘संत बाळूमामा’ यांचे चरित्र आणि त्यांच्यातील दैवत्वाची प्रचिती लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कलर्स मराठी वाहिनी ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. १३ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे.

अकोळ या गावामधील धनगर समाजातील एका कुटुंबामध्ये बाळूमामांचा जन्म झाला. बाळूमामांची आई विठ्ठलभक्त होती. बाळूमामांनी लहानपणापासूनच गरजूंना मदत केली आणि त्यांच्या शक्तीची प्रचीती हळूहळू लोकांना येत गेली. या सगळ्या प्रवासामध्ये बाळूमामांची आई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. आई सुंदराने बाळूमामांना कसं घडवलं? आईबरोबर बाळूमामांचं नातं कसं होतं? देवऋषी आणि बाळूमामा यांमधील संघर्ष कसा होता हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

वाचा : ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या सिक्वलमध्ये करिना आणि अर्जुन कपूर

वाट चुकलेल्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि त्यांच्या शंकेचे निरसन करणारा अवलिया म्हणजेच थोर संत बाळूमामा. बाळूमामांचे हजारो अनुयायी त्यांच्यापुढे आजही नतमस्तक होतात. “तुम्ही माझ्याकडे येऊ नका मी तुमच्याकडे येतो” असं सांगून हजारो लोकांना आधार देणाऱ्या असाधारण माणसाचे म्हणजे संत बाळूमामांचे चरित्र या मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळणार आहे.