प्रसिद्ध गायक-संगीतकार बप्पी लहरींचं गाणं आता हॉलिवूडपर्यंत पोहोचणार आहे. कारण मार्व्हल स्टुडिओच्या आगामी चित्रपटात बप्पी लहरींचं गाणं ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मार्व्हल स्टुडिओशी चर्चा होत असल्याचं बप्पी यांनी स्वत: स्पष्ट केलं आहे. याआधी बप्पी लहरींच्या ‘झूम झूम झूम बाबा’ या लोकप्रिय गाण्याचा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला अमेरिकन चित्रपट ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी २’च्या प्रमोशनल क्लिपमध्ये समावेश करण्यात आला होता.
”गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी २’मध्ये माझ्या गाण्याची झलक ऐकायला मिळाली. या चित्रपटाचा मुख्य अभिनेता क्रिस प्रॅटलाही माझं गाणं फार आवडलं होतं. आता तुम्हाला माझं पूर्ण गाणं मार्व्हल स्टुडिओच्या चित्रपटात ऐकायला मिळू शकेल. एप्रिलमध्ये मी हॉलिवूडला जाईन,’ असं बप्पी म्हणाले.
वाचा : कंगना रणौत पाळणार दहा दिवसांचे मौनव्रत
बप्पी लहरी जवळपास गेल्या ५० वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत. बॉलिवूडला त्यांनी बरीच हिट गाणी दिली आहेत. त्यांनी दिग्दर्शक म्हणूनसुद्धा काम केलं आहे. ते लवकरच एका म्युझिकल चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘एक अधुरा संगीत’ असं या चित्रपटाचं नाव असेल.