शशी कपूर यांच्या निधनानंतर विविध मार्गांनी त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातून या अभिनेत्याला श्रद्धांजली देत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. पण, याच सोशल मीडियामुळे कपूर यांना श्रद्धांजली देताना अनेकांचा गोंधळही उडाला. एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तवाहिनीने ठळक बातमी देण्याच्या नादात शशी कपूर यांच्या ऐवजी शशी थरुर यांच्या निधनाची बातमी दिली. त्यानंतर अनेकांनीच सोशल मीडियावरुन शशी थरुर यांनाच श्रद्धांजली वाहिली. शेवटी खुद्द शशी थरुर यांनीच हा गोंधळ झाला असल्याचे इतरांच्या लक्षात आणून दिले आणि ही चूक सर्वांच्या लक्षात आणून दिली.

नावात काहीसे साम्य असल्यामुळे झालेला हा गोंधळ सावरत नाही तोच बीबीसी या वृत्तवाहिनीने शशी कपूर यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध केले. पण, त्यांच्याविषयीची माहिती देण्यासाठी म्हणून वापरल्या जाण्याऱ्या व्हिडिओंमध्ये त्यांनी शशी कपूर यांच्याऐवजी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचे व्हिडिओ दाखवले.

वाचा : अरेरे ! सोशल मीडियावर शशी कपूरऐवजी शशी थरूर यांना वाहिली श्रद्धांजली

https://twitter.com/Lurganexile/status/937823571082207232

https://twitter.com/katherineschof8/status/937822919639650312

वाचा : शशी कपूर नसते तर मी सिनेसृष्टीपासून दूर गेलो असतो- अमिताभ

हीच चूक हेरत काही क्षणांतच सोशल मीडियावर अनेकांनीच त्या वृत्तवाहिनीच्या बातमीपत्राबद्दल नाराजी व्यक्त केली. काहींनी तर उपरोधिक ट्विट करत शशी कपूर यांचे निधन झाल्याचे त्या वाहिनीच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवणाऱ्या एका महान अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीत अशी चूक होणे ही काही सर्वसाधारण बाब नाही हाच मुद्दा अनेकांनी अधोरेखित केला. काहींनी ही घटना अपमानास्पद असल्याचे म्हणत त्या वाहिनीने झाल्या प्रकाराविषयी माफी मागावी अशी मागणीही केली. इतकेच नव्हे तर, चुकीच्या पद्धतीचे व्हिडिओ दाखवल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये गैरसमज आणि गोंधळाचे वातावरणही पाहायला मिळाले. सोशल मीडियावरील या सर्व प्रकारामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत ‘बीबीसी न्यूज अॅट सिक्स अॅण्ड टेन’चे संपादक पॉल रॉयल यांनी सर्वांची माफी मागितली. ‘आमच्याकडून चुकीचे फोटो वापरण्यात आले. हे आमच्या पठडीत बसणारे नाही. पण, तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची क्षमा मागतो’, असे ट्विट त्यांनी केले.