सध्या संपूर्ण जगात करोना व्हायरसची दहशत पाहायला मिळते. संपर्कातून करोनाची लागण होण्याचा धोका वाढत असल्यामुळे लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले. अनेक देशांमध्ये करोनाचा फटका वाहतूक, पर्यटन व्यवसाय, उद्योगधंदे यांच्यावर हळूहळू बसत असल्याचे पाहायला मिळते. भारतात मनोरंजन विश्वालाही याची झळ पोहोचली आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरणाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. आता मराठी चित्रपटसृष्टीवरही करोनाचे सावट आले आहे.

अभिनेता सुबोध भावेच्या ‘अश्रृंची झाली फुले’ या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत होणार होते. पण करोनामुळे ते रद्द करण्यात आले आहेत. खुद्द सुबोध भावेने त्याच्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. २७ मार्च ते २८ एप्रिल दरम्यान ‘अश्रृंची झाली फुले’ या नाटकाचे दोन प्रयोग अमेरिकेत होणार होते. पण आता करोनाची खबरदारी म्हणून प्रयोगाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा : करोनामुळे अक्षयच्या ‘गुड न्यूज’साठी बॅड न्यूज

तसेच चीनमध्ये चित्रीकरण होणाऱ्या चित्रपटांनाही करोनाचा फटका बसला आहे. इंडियन २ चित्रपटाचे चीनमधील चित्रीकरण सध्या रद्द करण्यात आले असून चित्रीकरणाच्या तारखा पुढे ठकलण्यात आल्या आहेत. तसेच अमेरिकन गायक खालिद एप्रिल महिन्यात मुंबई आणि बंगळुरु शहरात टूरसाठी येणार होता. मात्र त्याने आता ही म्युझिकल टूर रद्द केल्याचे समोर आले आहे.