मनोरंजन आणि क्रीडा जगतात सर्वात जास्त लक्ष कोणत्या दोन गोष्टींवर असेल तर ते म्हणजे बॉलिवूड आणि क्रिकेट. क्रिकेटर्स आणि बॉलिवूडच्या अफेअर्सच्या कहाण्या काही नवीन नाहीत. सध्या विराट आणि अनुष्का यांची लव्ह स्टोरी सगळ्यांच्या तोंडी आहे. पण याआधीही अनेक क्रिकेटर्स अभिनेत्रींच्या प्रेमात पडले होते. काहींनी तर लग्न करुन यावर कायमची मोहरही लावली. नुकतेच विराट आणि अनुष्का लग्नबंधनात अडकले.

विराटव्यतिरिक्त असे क्रिकेटपटू आहेत ज्यांनी इतर क्षेत्रातील मुलींपेक्षा बॉलिवूडमधील अभिनेत्रींनाच आपलं हृदय देणं पसंत केलं. नक्की हे क्रिकेटर्स कोण आणि ते ज्यांच्या प्रेमात पडले त्या अभिनेत्री कोण हे आपण आज जाणून घेणार आहोत.

विरुष्काच्याआधी भारताचा गोलंदाज जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांचे लग्न चर्चेचा विषय ठरले होते. गेल्या दीड वर्षांपासून सागरिका आणि झहीर एकमेकांना डेट करत होते. यानंतर त्यांनी २३ नोव्हेंबरला लग्न केले.

गेल्यावर्षी २९ नोव्हेंबरला टीम इंडियाचा स्टायलिश खेळाडू युवराज सिंगने बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले.

ऑफ स्पिनर हरभजन सिंगने २९ ऑक्टोबर २०१५ ला अभिनेत्री गीता बसराशी विवाह केला.

१९९४ मध्ये एका जाहिरातीदरम्यान संगीता बिजलानी आणि मोहम्मद अजरुद्दीन यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्नही केले. पण लग्नाच्या अनेक वर्षांनी दोघांचे मार्ग वेगळे झाले.

आपल्या करिअरच्या उच्च स्थानी असताना रीना रॉय आणि मोहसिन खान यांनी १९८३ मध्ये लग्न केले. घाई गडबडीत झालेलं हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. दोघांनीही घटस्फोट घेऊन आपले मार्ग वेगळे केले.

काही अफेअर्स अशीही होती ज्यांच्या चर्चा खूप रंगल्या पण त्यांनी कधीही लग्न केले नाही. यात विवियन रिचर्ड्स आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांचे नाव अग्रणी आहे. या दोघांना एक मुलगीही आहे. मुलीचे नाव मसाबा गुप्ता असून ती बॉलिवूडमधील नावाजलेली डिझायनर आहे.

मंसूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांची प्रेमकथाही तशी रंजकच आहे. १९६५ मध्ये एका मित्राच्या पार्टीत या दोघांची ओळख झाली आणि एकमेकांना पाहताचक्षणी ते प्रेमात पडले होते. चार वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान यांच्या प्रेमात होते. या दोघांच्या अफेअर्सची चर्चाही खूप रंगली होती. पण काही कारणांमुळे या नात्याचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही.

Story img Loader