आपल्या तुफान फलंदाजीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा क्रिकेटर युवराज सिंग सर्वांचाच आवडता आहे. अफलातून फलंदाजी करणारा क्रिकेटर किंवा कर्करोगालाही लढा देऊन बरा झालेला युवराज सर्वांनाच परिचित आहे. युवराजला धडाकेबाज फलंदाजीमुळे आणि खास शैलीत ठोकलेल्या सिक्सरमुळे ‘सिक्सर किंग’ म्हणूनही ओळखले जाते. मात्र क्रिकेटपूर्वी युवराजने अभिनय क्षेत्रातही नशिब आजमावले होते हे तुम्हाला माहित आहे का? आश्चर्यचकित झालात ना?
गायक आणि अभिनेता हंस राज हंस यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेहंदी शग्ना दी’ या पंजाबी चित्रपटात युवराज झळकला होता. १९९२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यावेळी युवराज फक्त ११ वर्षांचा होता. युवराजच्या जीवनावर आधारित येणाऱ्या चित्रपटात आपल्याला त्याच्या बालकलाकाराच्या भूमिकेबद्दल नक्कीच अधिक जाणून घेता येईल अशी अपेक्षा आहे. सर्वांसाठीच प्रेरणादायी असणाऱ्या युवराजच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. कर्करोगावर मात केल्यानंतर आपल्या ‘यूवीकॅन’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत युवराज कर्करोगाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहे.
(1992) 11 yr old Yuvraj Singh in the Punjabi film 'Mehndi Shagna Di'.#INDvPAK #IndVsPak #YuvrajSingh pic.twitter.com/TdV4z9oXgM
— Film History Pics (@FilmHistoryPic) June 18, 2017
सध्या युवराज आपल्या क्रिकेटमधील करिअरवर लक्ष केंद्रीत करतोय. क्रिकेटच्या करिअरमध्ये आतापर्यंत ३०० सामने खेळल्याबद्दल त्याने आयसीसी चॅम्पियन्स करंडक २०१७ दरम्यान ट्विट केलं. आपल्या यशाचं श्रेय सौरव गांगुलीला देत युवराज एका मुलाखतीत म्हणाला की, ‘सौरव गांगुली माझा आवडता कर्णधार होता. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं आणि त्यांच्यामुळेच मी आज यशस्वी आहे.’
वाचा : कपिलविरोधात सुनिल देणार कृष्णा अभिषेकला साथ?
दरम्यान युवराज पत्नी हेजल कीचसोबत आपल्या वैवाहिक आयुष्याचादेखील आनंद घेत आहे. मागील वर्षी दोघांचं लग्न झालं होतं आणि एका डान्स शोमध्ये दोघेही स्पर्धक म्हणून एकत्र सहभागी होतील अशी खूप चर्चा होती. मात्र युवराजच्या क्रिकेट सामन्यांमुळे दोघे सहभागी होऊ शकले नाहीत.