हिंदी चित्रपटसृष्टीत आज इतक्या वर्षांच्या प्रवासात कलाकारांनी बरेच चढ- उतार पाहिले आहेत. याच कलाकारांच्या कारकिर्दीवर अभिनेते अन्नू कपूर त्यांच्या एका कार्यक्रमातून प्रकाशझोत टाकतात. अन्नू कपूर म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टी कोळून प्यालेला माणूस, असेच म्हणता येईल. बऱ्याच दिग्गज कलाकारांसोबत मित्रत्त्वाचं नातं असणाऱ्या आणि या कलाविश्वाला अगदी जवळून पाहिलेल्या अन्नू कपूर यांनी नेहमीच त्यांच्या बोलण्यातून विविध कलाकारांचे किस्से प्रेक्षकांसमोर मांडले आहेत. असाच एक किस्सा त्यांनी नुकताच ‘बिग एफ. एम’च्या ‘सुहाना सफर विथ अन्नू कपूर’ या रेडिओ शोदरम्यान सांगितला. स्मिता पाटील आणि अन्नू कपूर यांच्यामध्ये असणारी मैत्री आणि कलाकारांमध्ये असणारं सुरेख नातं त्यांच्या या अनुभवातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं.

अन्नू कपूर यांनी शेअर केलेला हा किस्सा होता ‘मंडी’ या चित्रपटादरम्यानचा. चौकटीबाहेरील चित्रपटांच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या ‘मंडी’ या चित्रपटामध्ये बऱ्याच कलाकारांचा अफलातून अभिनय पाहायला मिळाला होता. अन्नूजींच्या कारकीर्दीसाठी हा चित्रपट नवीन होता, किंबहुना त्यावेळी ही चित्रपटसृष्टीच त्यांच्यासाठी नवीन होती. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अन्नूजींना ‘बेताब’ या चित्रपटाची ऑफर आली आणि त्यानंतर त्यांना लगेचच या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बोलावणं आलं. या चित्रपटाच्या निमित्ताने कपूर यांनी पहिल्यांदाच हैद्राबाद ते बंगळुरु असा विमान प्रवास करायचा होता.

VIDEO: ‘चीज बडी है मस्त मस्त’चं हे व्हर्जन ऐकलं का?

याआधी कधीच विमान प्रवासाचा अनुभव नसणारे अन्नूजी त्यावेळी फार घाबरले होते. मनातील ही भावना त्यांनी स्मिता पाटील यांना सांगितली. त्यानंतर स्मिता पाटील यांनी डॉ. देशपांडे यांच्याकडून गोळ्या आणून त्या अन्नूजींना दिल्या होत्या. इतकंच नव्हे, तर सहकलाकाराच्या नात्याने त्या अन्नू कपूर यांना सोडण्यासाठी विमानतळावरही गेल्या होत्या. हा अनुभव सांगत अन्नू कपूर यांनी स्मिता पाटील यांनी त्यावेळी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभारही मानले. त्यांनी शेअर केलेला हा अनुभव सुश्राव्य होताच. पण, त्याचा हा अनुभव पाहता प्रेक्षकांना कलाकारांमध्ये असणारं नातं आणि एकमेकांबद्दल वाटणारी काळजीसुद्धा समोर आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : आमिरला चित्रपटात दगा देणारा ‘तो’ झाला यशस्वी अभिनेता