भाभीजी घर पर है फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेला काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची पाठराखण करणे महागात पडले आहे. पुलवामा दहशतवाद हल्ल्यासंदर्भात नवज्योत सिंग सिद्धूंनी केलेल्या वक्तव्याचे शिल्पाने समर्थन केले आणि त्यामुळेच ती सध्या ट्रोलची शिकार झाली आहे. शिल्पाचे चाहतेसुद्धा तिच्या या भूमिकेमुळे नाराज असून सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत आहे. इतकेच नव्हे तर तिला बलात्काराच्या धमक्याही येऊ लागल्या आहेत.

पुलवाम्यात दहशतवादांच्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानशी बोलून तोडगा काढण्याचे वक्तव्य नवज्योत सिंग सिद्धूंनी केले होते. त्यांनाही हे वक्तव्य चांगलेच भोवले होते. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करत शिल्पा म्हणाली होती, ‘काही दहशतवाद्यांमुळे संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणे योग्य नाही. प्रत्येक देशाच्या काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी असतात. त्या देशावर आरोप करण्यापेक्षा आपण दहशतवादाला थांबवणे गरजेचे आहे.’ शिल्पाच्या या वक्तव्यावर नेटकरी भडकले आहेत. शिल्पा शिंदेने काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे तिने नवज्योत सिंग सिद्धूंचे समर्थन करणे साहजिक आहे असेही मत काहींनी व्यक्त केले.

‘बलात्काराच्या धमक्यांना घाबरून मी घरी बसणार नाही. ज्यांना जे म्हणायचे आहे, करायचे आहे त्यांनी ते म्हणावे आणि करावे. पण या गोष्टीवर नक्कीच सर्वांनी विचार करायला पाहिजे की या देशातील महिला किती सुरक्षित आहेत?’, अशी प्रतिक्रिया शिल्पाने दिली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सिद्धू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’मधूनही सिद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

Story img Loader