टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘भाभी जी घर पर है’ मधील अनिता भाभी म्हणजेच सौम्या टंडनला परदेशात लुबाडलं. मागील आठवड्यात सौम्या तुर्कीमध्ये फिरायला गेली असता ही दुर्घटना घडली. इस्तांबूलमध्ये तिच्याकडील सुमारे ६० हजार रुपये चोरले गेले. या घटनेनंतर सौम्या अत्यंत घाबरलेल्या मनस्थितीत होती.

इस्तांबूलमध्ये सौम्या एका टॅक्सीमधून उतरल्यानंतर ही घटना घडली. टॅक्सीचालकाने तिच्याकडे सुट्टे पैसे मागितले आणि रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवली. जेव्हा सौम्याने पैसे दिले तेव्हा ते चलन चुकीचे असल्याचे सांगत टॅक्सीचालक तिच्यावर ओरडू लागला. तुर्कीमध्ये युरो आणि लीरा हे दोन्ही चलन चालत असल्याने गोंधळलेल्या मनस्थितीत असलेल्या सौम्याने पाकिटातून पैसे काढू लागली. तेवढ्यातच टॅक्सीचालकाने तिच्या पाकिटातून पैसे घेऊन तेथून पळ काढला. टॅक्सीचालक तेथून निघाल्यानंतर आपल्या पाकिटामध्ये १००० युरो नाहीत हे सौम्याच्या लक्षात आले.

saumya-tondon-1

आपल्या जबाबात सौम्याने घडलेली सर्व हकिकत सांगितली, ‘माझ्या पाकिटातील ८०० युरो टॅक्सीचालकाने चोरले. हे सर्व त्रासदायक होतं मात्र या घटनेने मला अजून सावध राहण्यास शिकवले. माझ्याकडे प्रवासाची पावती नसल्याने पोलीससुद्धा माझी काहीच मदत करू शकले नाही. त्यामुळे परदेशी प्रवास करणाऱ्यांनी सुरक्षेसाठी नेहमी टॅक्सीची पावती घेणे गरजेचे आहे.’

घडलेल्या घटनेतून धडा घेत सौम्या पुढे म्हणाली, ‘प्रत्येक घटनेची एक चांगली बाजू असतेच. आता मी ट्राममधून प्रवास करू लागले आहे आणि त्यामुळे मी खूप जास्त मौजमजा करू शकतेय. इथल्या स्थानिक लोकांकडून मला शहराबद्दल अधिक माहिती मिळण्यास मदत होतेय. ट्राममध्ये प्रवास करत असताना मला काही भारतीय भेटले आणि भाभी जी ही मालिका त्यांना खूप आवडत असल्याचेही त्यांनी सांगितले.’

‘भाभी जी घर पर है’ या प्रसिद्ध मालिकेतून सौम्या टंडन घराघरात पोहोचली. या मालिकेव्यतिरिक्त तिने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनदेखील केले. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या ‘जब वी मेट’ चित्रपटात सौम्याने करिना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती.