पु.ल म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, बहुरंगी, बहुढंगी कलाकार आणि तमाम महाराष्ट्राला खळखळून हसवणारे लेखक अशी त्यांची ओळख पिढ्यान् पिढ्या आपल्या मनावर कोरली आहे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाचा पूर्वार्ध नुकताच प्रदर्शित झाला. ‘भाई’ म्हणजेच पु.ल. खऱ्या आयुष्यात कसे होते हे जाणून घेण्याचं कुतूहल प्रत्येकाला आहे आणि हेच कुतूहल ‘भाई’ मधून उलगडून जातं. तसा हा भाग चरित्रपटाच्या पठडीत बसणारा नाही. भाईंच्या आयुष्यातील विविध प्रसंग आणि त्या प्रसंगांतून उलगडत गेलेलं त्यांचं साधेपण एकत्रित करून मांडण्यात आलेला बायोपिक.
पहिला भाग हा पूर्णपणे पु.लंच्या खासगी आयुष्यावर आधारलेला आहे. चित्रपटात बालपणापासून ते आतापर्यंतचे पु.लं, असा प्रवास सुरू होतो. या प्रवासाताच सुनीताबाई आणि पु.लं या दोन्ही भिन्न स्वभावाच्या माणसांचा फुलत गेलेला संसारही पाहायला मिळतो. मात्र सरसकट एक कहाणी न ठेवता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अत्यंत छोट्या छोट्या प्रसंगांतून पु.ल उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या छोट्या छोट्या प्रसंगातले काही प्रसंग आणि त्यातले संवाद हे मनाला भावतात मात्र काही प्रसंगांचं आकलन प्रेक्षकांना होत नाही. अनेक ठिकाणी त्यांचे संदर्भ लागत नाही. काही प्रसंगाचे कारण कळत नाही, कदाचित त्याचा खुलासा पुढच्या भागात होऊ शकेल.
प्रत्येक गोष्टीत आनंद बघण्याची त्यांची दृष्टी किती निरागस होती त्याचे आपल्याला दर्शन आपल्याला भाईमधून घडते. खरं तर यापूर्वी अनेकांनी पुलं.ची भूमिका साकरली आहे. काहींनी पुलं.ना प्रत्यक्षातही पाहिलं आहे त्यामुळे चित्रपटात भाईंची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या सागर देशमुखकडून फार अपेक्षा असणं साहजिक आहे. या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सागरनं केलाय. मात्र या सगळ्यात काही ठिकाणी सुनीताबाईंची भूमिका साकारलेली इरावती हर्षे काकणभर सरस ठरते. पु.ल हे फार मोठं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या अनेक कथा या त्यांना भेटलेल्या व्यक्तींभोवती फिरतात. त्यामुळे पूर्वार्धात पु.लंच्या आयुष्यातील बऱ्याच व्यक्तिरेखा पाहायला मिळतात. यात ऋषीकेश जोशी सर्वात लक्षात राहतो.
पु.ल म्हणजे वाचकांना भरभरून आनंद देणारं व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखलं जातं. मात्र तितकाच भरभरून आनंद प्रेक्षकांना द्यायला ‘भाई’चा पूर्वार्ध थोडासा कमी पडतो. पण ‘भाई’चा हा पूर्वार्ध जाता जाता उत्तरार्धबद्दल तितकंच कुतूहलही निर्माण करतो.