राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. यावेळी महाराष्ट्राचा लाडका अभिनेता भालचंद्र कदम म्हणजे तुमच्या आमच्या भाऊ कदमची मोठी मुलगी मृण्मयी कदम हीने सुद्धा दहावीची परीक्षा दिली होती. मृण्मयी दहावीत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाली. आता मुलगी फर्स्ट क्सासने पास झाली म्हटल्यावर ओळखीच्या व्यक्तींचं भाऊ तोंड गोड करणार नाही हे कसं होईल. भाऊनं चला हवा येऊ द्याच्या संपूर्ण टीमला ही गोड बातमी देऊन त्यांचे पेढ्यांनी तोंड गोड केले. यावेळी अभिनेता कुशल बद्रीकेने संपूर्ण टीमसोबत एका खास व्हिडिओही फेसबुकवर शेअर केला.
स्वतःवरचेच व्हायरल जोक्स जेव्हा रिंकू वाचते…
पोरगी पास झाल्याचं सुख काय असतं हे सध्या भाऊ अनुभवतोय असं कुशल सांगत असताना पाठीमागे सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे हे रडण्याचा अभिनय करताना दिसतात. त्यांच्या या खोट्या रडण्यात भाऊही त्यांना साथ देताना दिसतो. खूप भरून आलंय असं भाऊने म्हटल्यावर सगळ्या खानदानाचे मिळून मृण्मयीने गुण मिळवले, असं म्हणत भारत गणेशपुरेने भाऊची खिल्ली उडवली. नंतर मात्र सगळ्यांना एक एक पेढा देण्याच्या उद्देशाने आणलेला पेढ्यांचा पुडा या लोकांनीच फस्त केला. आपल्या मित्रांना तो पुडा संपवू नका अशी विनंती भाऊ करत होता पण तोपर्यंत बाकीची मंडळी तो पुडा घेऊन निघूनही गेली होती.
हा गमतीशीर व्हिडिओ कुशलने फेसबुकवर शेअर केल्यानंतर आतापर्यंत २७ हजार लोकांनी ही पोस्ट पाहिली तर १.५ हजार लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला. तर १६५ लोकांनी मृण्मयीला अभिनंदन करणाऱ्या कमेंटही केल्या.
सध्याच्या घडीला इतर मराठी कार्यक्रमांमध्ये चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला चांगलीच पसंती मिळत आहे. प्रेक्षकांनी हा कार्यक्रम अक्षरशः डोक्यावर उचलून धरला आहे. टीआरपीच्या बाबतीतही या कार्यक्रमाने आघाडीच्या मालिकांना मागे टाकले आहे.