नवी दिल्लीमध्ये ६६ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली. ‘भोंगा’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांमध्ये गतवर्षीप्रमाणे यंदाही मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. मराठी चित्रपटांनी पाच राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ या चित्रपटाने दोन पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. मात्र अनेक मराठी प्रेक्षकांनी ‘भोंगा’ या सिनेमाबद्दल पहिल्यांदाच ऐकले आहे. त्यामुळेच जाणून घेऊयात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या ‘भोंगा’ या सिनेमाबद्दल…

>
शिवाजी लोटन पाटील यांनी ‘भोंगा’ या चित्रपटाला दिग्दर्शन  केले आहे.

>
सिनेमाची कथा  शिवाजी लोटन पाटील आणि निशांत ढापसे यांनी लिहिली आहे.

>
अर्जून महाजन आणि शिवाजी लोटन पाटील यांनी या सिनेमाची निर्मिती  केली आहे.

>
याआधी शिवाजी लोटन पाटील यांना धग या सिनेमासाठी २०१२ साली सर्वोत्तम दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

>
अमोल कागणे आणि दिप्ती धोत्रे या दोघांनी या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय सिनेमामध्ये कपिल कांबळे, श्रीपाद जोशी यांचाही अभिनय पहायला मिळणार आहे.

>
अमोल कागणे यांनी निर्माता म्हणून आपल्या चित्रपट क्षेत्रातील करियरला सुरुवात केली. पदार्पणातच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये त्यांनी यशस्वी निर्मात्याचे बिरुद पटकावलं. ‘हलाल’, ‘लेथ जोशी’ आणि ‘परफ्युम’ या चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीनंतर अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. पुण्यामधील ललित कला केंद्रातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलेल्या अमोल कागणेने तब्ब्ल २६ हुन आधी नाटकांमध्ये अभिनय केला आहे. तर दिप्ती धोत्रे हिने ‘श्रवणम्’, ‘मी शिवाजी पार्क’, ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमांमध्ये काम केले आहे.

>
रमाणी दास यांनी ‘भोंगा’चे नृत्य दिग्दर्शन केले आहे.

>
‘भोंगा’ सिनेमाचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे.

>
‘भोंगा’ला विजय गटेलवार यांनी संगीत दिले असून गिते सुबोध पवार यांची आहेत.

>
‘भोंगा’ या चित्रपटाने मे महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्रराज्य सरकारच्या ५६ व्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराबरोबरच एकूण पाच पुरस्कार पटकावले होते.

>
सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शिवाजी लोटन पाटील), सर्वोत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शक (शिवाजी लोटन पाटील) आणि सर्वोत्कृष्ट पटकथा (शिवाजी लोटन पाटील) या पाच पुरस्कारांचा समावेश होता.

कथा

‘भोंग’ ही एका मध्यमवर्गीय मुसलीम कुटुंबाची कथा आहे. या कुटुंबातील नऊ महिन्याच्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दूर्धर आजार झालेला असतो. या आजारामध्ये रक्तामधील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होऊन त्याचा परिणाम मेंदूवर होतो. आर्थिक टंचाईमुळे या कुटुंबाला आपले राहते घर सोडून दुसऱ्या जागी राहायला जावे लागते. हे नवे घर मशीदीच्या अगदी जवळ असते. दरवेळी अजान झाली की बाळ रडू लागते. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्बेतीवर आणखीन परिणाम होत असल्याचे सर्वांना जाणवते. त्यानंतर या बाळाचे वडील, काका आणि इतर गावकरी यासंदर्भात काय करतात आणि पुढे काय होते याबद्दल सिनेमाची कथा आहे.

सिनेमाचा कालावधी: ९५ मिनिटे