संजय दत्तच्या ‘भूमी’ सिनेमाची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याने स्वीकारलेला हा पहिला सिनेमा आहे. अशा या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. मुलगी आणि वडिलांच्या नात्यावर हा सिनेमा भाष्य करतो. मुलीची अब्रू वाचवण्यासाठी आणि तिला सन्मान मिळवून देण्यासाठी झगडणारा बाप यातून दिसणार आहे. या सिनेमात संजयच्या मुलीची भूमिका अदिती राव हैदरीने साकारली आहे.
‘बिग बॉस’ फेम स्वामी ओम यांना अटक
हा सिनेमा एका गंभीर विषयावर भाष्य करतो, त्यामुळे या सिनेमात संजयच्या अभिनयाचा कस लागणार यात काही शंका नाही. भूमीला म्हणजेच अदितीला अत्याचाराला सामोरे जावे लागते. आपल्या मुलीला न्याय मिळावा एवढीच त्या बापाची इच्छा असते. पण त्याची ही इच्छाही लगेच पूर्ण होते असे नाही. म्हणूनच मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तो संपूर्ण जगाशी लढायला निघतो. या ट्रेलरमध्ये शेखर सुमन हा संजय दत्तच्या मित्राची भूमिका बजावताना दिसतोय. तर, खलनायक म्हणून शरद केळकर लक्षात राहतो. ट्रेलरमधील काही दृश्ये मन हेलावणारी आहेत.
संजयच्या ‘भूमी’ची कथा ही श्रीदेवीच्या ‘मॉम’ या सिनेमाप्रमाणेच मात्र, वडिलांचा दृष्टीकोन बाळगणारी असेल असे प्रथमदर्शनी वाटते. ‘सरबजीत’ फेम उमंग कुमार या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या २२ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून नक्कीच या सिनेमाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढेल यात काही शंका नाही. आपल्या कमबॅक सिनेमाबद्दल बोलताना संजू बाबा म्हणाला, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत या सिनेमात काम करण्याचा अनुभव खूपच चांगला आहे. या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर खूपच भावनिक झाल्याचे त्याने म्हटले आहे. यानंतर संजय दत्त राजकुमार हिरानीसोबत ‘मुन्नाभाई’ सिरिजचा शेवटचा सिनेमा करणार आहे.