‘बिग बॉस १३’चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीत तसंच मालिका विश्वात मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयानं दिली आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.

सिद्धार्थच्या निधनानंतर सोशल मीडियावरून अनेक सेलिब्रिटी आणि चाहते हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहत आहेत. ‘बालिका वधू’ या मालिकेमुळे सिद्धार्थला मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर ‘बिग बॉस’ या शोमधून त्याने लाखो प्रेक्षकांची पसंती मिळवली. अगदी कमी वयात सिद्धार्थचं झालेलं अकाली निधन ह्रदय पिळवटून टाकणारं आहे. या आधी सिद्धार्थने दोनदा मृत्यूला चकवा दिला आहे. मात्र यावेळी त्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे.

हे देखील वाचा: फिटनेसफ्रीक, हॅण्डसम अन्… अशी होती ‘बिग बॉस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची लाइफस्टाइल

२०१८ सालामध्ये सिद्धार्थ एका अपघातातून थोडक्यात बचावला होता. २०१८ सालामध्ये सिद्धार्थ शुक्लाच्या कारला अपघात झाला होता. सिद्धार्थ बीएमडब्ल्यु ही त्याची गाडी चालवत असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याची गाडी अन्य तीन गाड्यांवर आदळली. या अपघातात कोणीही इतर जखमी झालं नव्हतं. मात्र सिद्धार्थला किरकोळ जखम झाली होती. मुंबईमधील ओशिवरा भागात हा अपघात झाला होता. यावेळी गाडी दुभाजकाला धडकल्याने गाडीचं देखील मोठं नुकसान झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिलांनी सिद्धार्थला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली होती.

अपघात होण्याची सिद्धार्थची ही पहिली वेळ नव्हती तर २०१४ सालामध्ये देखील सिद्धार्थ शुक्लाच्या कारला जुहू परिसरात अपघात झाला होता. यावेळी सिद्धार्थच्या कारने एका गाडीला धडक दिली होती. मात्र याप्रकरणी कोणीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.