‘बिग बॉस’ या वादग्रस्त रिअॅलिटी शो ला सुरुवात होताच या क्रार्यक्रमाच्या सुरुवातीलाच काही गौप्यस्फोट व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे हा कार्यक्रम चर्चेत आला आहे. या कार्यक्रमामुळे सहसा स्पर्धक आणि कलाकार वादग्रस्त चर्चांमध्ये येतात. पण, ‘बिग बॉस’ च्या या १० व्या पर्वामध्ये क्रिकेटर सुवराज सिंगचा भाऊसुद्धा चर्चेत आला आहे. आकांक्षा शर्मा ही ‘बिग बॉस’च्या १० व्या पर्वामधील सेलिब्रिटी घरातील सून आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. क्रिकेटर युवराज सिंगचा भाऊ जोरावर सिंग याची ती पत्नी आहे. एका प्रसिद्ध कुटुंबामध्ये विवाह झाल्यामुळे आकांक्षाच्या मित्रपरिवारामध्ये आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. पण, तिच्या बाबतीच मात्र याउलटच घडले. एका प्रतिष्ठित कुटुंबामध्ये विवाहबद्ध झालेल्या आकांक्षाला जोरावरमध्ये एक चांगला पतीही नाही गवसला आणि चांगला मित्रही.

‘बिग बॉस’मध्ये सूत्रसंचालक सलमान खानसमोर आकांक्षाने तिचे मन मोकळे केले. या कार्यक्रमामध्ये आकांक्षा एक सेलिब्रिटी म्हणून नाही, तर एक सर्वसामान्य व्यक्ति म्हणून आली आहे. २०१४ मध्ये आकांक्षाचे युवीच्या भावासोबत लग्न झाले होते. पण लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांमध्येच तिला जगण्यापेक्षा मरण्याचा मार्ग जास्त सोपा वाटू लागला. आकांक्षावर एक वेळ तर अशीही आली होती, जेव्हा तिला घर सोडून पळून जावेसे वाटत होते. पण कोणताही चुकीचा निर्णय न घेता आकांक्षाने या नात्यातून स्वत:ला वेगळे करत एकटे जगण्याचा निर्णय घेतला. ‘मला माझ्या सासरच्यांकडून काहीही नको आहे. मला फक्त जोरावरपासून घटस्फोट हवा आहे’, असे आकांक्षा म्हणाली.

आकांक्षाने तिचा प्रवास सांगताना इतर कोणाविषयीही कोणतीच तक्रार केली नाही. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात आकांक्षाचा प्रवास पाहण्याजोगा ठरणार आहे.