‘बिग बॉस’चा अकरावा सिझन सुरू झाल्यापासून सर्वांत जास्त चर्चेत असणारं नाव म्हणजे अभिनेत्री शिल्पा शिंदे. ‘भाभीजी घरपे है’ या मालिकेत तिने साकारलेल्या अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. निर्मात्यांशी झालेल्या वादानंतर तिला मालिका सोडावी लागली होती. मालिकेचा निर्माता विकास गुप्तासुद्धा ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच शिल्पा तिच्या वादांमुळे चर्चेत आहे. विकासनंतर ‘बिग बॉस’च्या घरात नुकताच शिल्पाचा आणखी एका व्यक्तीसोबत वाद झाला. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री हिना खानसोबत हा वाद झाला. मात्र यावेळी ‘बिग बॉस’च्या घराबाहेरील एक व्यक्ती शिल्पाच्या बाजूने उभी राहिली आहे. ‘बिग बॉस’ची माजी विजेती गौहर खान शिल्पाच्या मदतीला धावली आहे.
शिल्पा आणि हिनाच्या या वादाची सुरूवात एका टास्कवरून झाली. ‘बिग बॉस’ने पाठवलेल्या लक्झरी टास्कची माहिती वाचून दाखवण्याची वेळ शिल्पावर आली होती. यावेळचे टास्क हिना, आर्शी आणि पुनीश यांच्यात खेळले गेले. या टास्कशी निगडीत पत्र शिल्पाला वाचून दाखवायला सांगितले तेव्हा तिला ते पत्र नीट वाचता येत नव्हते. अखेर वैतागून हिनाने पत्र वाचण्यास घेतले. त्यानंतर तिने शिल्पाच्या इंग्रजीवरून खिल्लीही उडवली होती. तिचं हे वागणं ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक आणि विजेती गौहर खानला पटलं नाही. ट्विटरच्या माध्यमातून तिने नाराजी व्यक्त केली आणि अप्रत्यक्षपणे हिनाला टोला लगावला. ‘वाचता न येणं ही वाईट गोष्ट आहे का? तुम्हाला इंग्रजी भाषा येत नसेल तर याचा अर्थ तुम्ही अशिक्षित आहात असा होतो का?,’ असं ट्विट गौहरने केलं.
Kya padhna naa aana koi buri baat hai??? Agar aapko angrezi nahi aati are u uneducated ?? Hmmmmmmmm
— Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) October 5, 2017
वाचा : ‘काहे दिया परदेस’ फेम ऋषी सक्सेना बॉलिवूडसाठी करतोय तयारी?
स्पर्धकांमध्ये होणाऱ्या वादविवादांमुळेच ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. भविष्यात ‘बिग बॉस’च्या घरात शिल्पा आणि हिनाचं शीतयुद्ध पाहायला मिळेल यात काही शंका नाही. आता या वादाचा शोच्या टीआरपीला कितपत फायदा होईल हे येत्या काळातच स्पष्ट होईल.