‘बिग बॉस ११’ मध्ये आपल्या अदांनी आणि भांडणांनी टीआरपी मिळवणारी मॉडेल-अभिनेत्री अर्शी खानबद्दल दाक्षिणात्य अभिनेत्री गहना वशिष्ठने अनेक खुलासे केले आहेत. गहनाने अर्शीशी निगडीय या सर्व गोष्टी एका पत्रकार परिषदेत सांगितल्या. भोपालमध्ये राहणारी अर्शी मुळची अफगाणिस्तानमधील आहे. ‘बिग बॉस’मध्ये शिल्पा शिंदेसोबतची मैत्री आणि जुबैर खानसोबत केलेल्या वादामुळे चर्चेत आलेल्या अर्शीबाबत गहना म्हणाली की, अर्शीने शोमध्ये आपले चुकीचे वय सांगितले असून तिने याआधी एका ५० वर्षांच्या पुरूषासोबत लग्नही केले होते.
गहनाच्या मते, अर्शीचे वय ३२ हून जास्त असून तिने ‘बिग बॉस’मध्ये आपले वय २७ सांगितले आहे. वयाप्रमाणेच अर्शीने आपल्या शिक्षणाबद्दलची माहितीही खोटी दिली आहे. एवढे खुलासे करुन गहना थांबली नाही ती पुढे म्हणाली की, अर्शीच्या नावावर १० वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. यातील सर्वात मोठा गुन्हा हा विवस्त्र शरीरावर तिने भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे पेटिंग केले होते हा आहे. याशिवाय अर्शीचे पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीसोबत अफेअर असल्याचीही चर्चा होती. स्वतः शाहिदने असे काही नसल्याचे स्पष्ट केले होते. गहनाच्या मते, अर्शी एकदाही शाहिद आफ्रिदीला भेटली नव्हती.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात सध्या नवनवीन वादांनी स्पर्धक त्रस्त झाले आहेत. ढिंच्याक पूजा ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर आता एका नव्या वादाला सुरूवात झाली. एरवी घरातील सगळे स्पर्धक वेगवेगळ्या दिशांना तोंड करुन असतात. पण यावेळी घरातील सर्व सदस्य पूजाविरुद्ध एकटवलेले दिसले.