राहुल महाजन हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा चिरंजीव राहुल अनेकदा त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला आहे. नुकतीच राहुलने ‘बिग बॉस १४’च्या घरात एण्ट्री केली असून या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून तो चर्चेत आला आहे. अलिकडेच राहुलने त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी धर्मपरिवर्तन केल्याचा खुलासा केला. त्याच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे, असं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

‘बिग बॉस १४’ मध्ये राहुल चॅलेंजर म्हणून सहभागी झाला असून घरात प्रवेश केल्यानंतर त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. ‘माझ्या पत्नीने धर्मपरिवर्तन केलं आहे’, असं वक्तव्य त्याने या शोमध्ये केलं आहे.

आणखी वाचा- Bigg Boss 14 : राहुल वैद्यने सोडलं ‘बिग बॉस’चं घर; मागितली सलमानची माफी

“माझी पत्नी रशियन असून तिने हिंदू धर्मात परिवर्तन केलं आहे. आम्ही दोघंही अध्यात्माच्या मार्गावर आहोत. तसंच आम्ही दोघंही रेल्वेच्या दोन रुळाप्रमाणे आहोत. आम्ही कधीच एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाही. नात्यातील समपोल राखण्यासाठी आम्ही एकमेकांना स्वत:ची स्पेस दिली आहे”, असं राहुलने सांगितलं.


पुढे तो म्हणतो, “नताल्या रशियन आहे. मात्र, तिने स्वत:ला हिंदू धर्मात परिवर्तित केलं आहे. मी कायम तिला शिव-पार्वतीचं उदाहण देतो. आपलं नातं हे शिव-पार्वतीप्रमाणे असावं असं मी कायम तिला सांगतो. मी तिला भगवद्गगीता शिकवतो. आम्ही अनेक आध्यात्मिक पुस्तकं एकत्र वाचतो”.

आणखी वाचा- राहुल बिग बॉसच्या घरातून का बाहेर पडला?- गौहर खान

दरम्यान, राहुलच्या पत्नीचं नाव नताल्या आहे. राहुल आणि नताल्यामध्ये जवळपास १८ वर्षांचं अंतर आहे. राहुल महाजनचं हे तिसरं लग्न आहे. यापूर्वी त्याने श्वेता सिंहसोबत पहिलं लग्न तर डिम्पी गांगुलीसोबत दुसरं लग्न केलं होतं. मात्र, या दोघींनीही त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप करत त्या विभक्त झाल्या. राहुल महाजनला खरी ओळख बिग बॉसमधून मिळाली. मात्र, तो त्याच्या पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत राहिला.