हिना खानच्या वक्तव्यांवर घरातले वादविवाद कमी न होता वाढतानाच दिसत आहे. टीव्ही इंडस्ट्रीमधील बहुतांश लोक टीव्हीवरील प्रसिद्ध सूनेच्या विरोधात उभे राहिले आहेत. हिनाने साक्षी तन्वरला ‘तिरळी’ म्हटले होते. साक्षीला अशा पद्धतीने तिरळी बोलल्याने टीव्ही अभिनेत्रींनी तिची शाळा घेतली.

‘बिग बॉस ७’ ची विजेती गौहर खानने ट्विटरवर तिचे मत व्यक्त केले. गौहर म्हणाली की, ‘चांगुलपणा आणि संस्कार तर शिकली नाही, पण किमान बोलणं शिकली असती तर आपल्या निरर्थक बोलण्याने लोकांसमोर हसू तर झालं नसतं… देव साऱ्यांनाच बुद्धी दे.. गर्विष्ठपणाने आजपर्यंत कोणाचाच फायदा झाला नाही. साक्षी तन्वर तू खूप सुंदर दिसतेस.’

काही दिवसांपूर्वी बिग बॉसमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हिनाने गौहर खानच्या प्रसिद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हिना म्हणाली की, गौहर खानचे फॉलोवर्स माझ्यापेक्षा कमी आहेत. माझ्या अर्ध्याहून अर्धेही नाहीत. यानंतर तिने साक्षीला तिरळी म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावर फक्त गौहर खानच नाही तर काम्या पंजाबी, उर्वशी ढोलकिया आणि किश्वर मर्चंट यांनीही हिनाला चांगलेच सुनावले.

काम्या म्हणाली की, ‘ही खरंच हिना खान आहे? जे मी पाहिलं ते खरंय? कोण आहे ही? कुठून आलीये? गौहर खान आय लव्ह यू. मला तुझा अभिमान वाटतो. हिना तू साक्षी तन्वरसारखी आधी होऊन दाखव. साक्षीचं नाव घ्यायची तुझी तर लायकीही नाही,’ असे काम्याने ट्विट केले.
या तिघींशिवाय अनिता हसनंदानी आणि करण पटेल यांनीही साक्षी तन्वरबद्दल केलेल्या वक्तव्यावर हिनाला खडे बोल सुनावले.