‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरात नवनवीन टास्क रंगत आहेत आणि जो तो आपापल्या परीने बिग बॉसचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. ‘बिग बॉस’चं घर हे अनेक गोष्टींचा खजिना आहे. या घरामध्ये अनेकांनी त्यांच्या भावनांना मोकळी वाट करुन दिली तर काहींनी त्यांचा संपूर्ण जीवनप्रवासही उलगडला. यामध्येच घरामध्ये सर्वात समजूतदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोरी शहाणे यांनीदेखील त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी या घरामध्ये शेअर केल्या. यामध्ये त्यांनी त्यांचा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश कसा झाला हे सांगितलं.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात शांत आणि सामंजस्याने प्रत्यके गोष्टीला सामोऱ्या जाणाऱ्या किशोरी शहाणे यांनी आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे अशा दिग्गज कलाकारांसोबत काम केलेल्या किशोरी शहाणे यांचा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दबदबा आहे.

‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकातून करिअरची सुरुवात करणाऱ्या किशोरी यांचा प्रत्येक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यामुळेच आजही प्रेक्षकांमध्ये त्यांची लोकप्रियता पाहायला मिळते. मात्र किशोरी शहाणे यांचं मराठी चित्रपटसृष्टीत नक्की पदार्पण कसं झालं हा प्रश्न आजही चाहत्यांना पडलेला दिसतो. मात्र आता चाहत्यांना त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. वूटच्या अनसीन अनदेखाच्या क्लिपमध्ये त्यांनी त्यांच्या करिअरबद्दल अनेक गोष्टींचा उलगडा केला.

“कलाविश्वामध्ये माझं येणं हे एकप्रकारे योगायोगच होता. मी आठवीत असताना न्युजपेपरमध्ये एक जाहिरात आली होती. या जाहिरातीमध्ये दुर्गा झाली गौरी या नाटकासाठी बालकलाकार हवे होते. जी लहान मुलं नृत्य करु शकतात अशांना प्राधान्य होतं. मुळात मी डान्स शिकले नव्हते.मात्र या नाटकात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे मी माझ्या वडिलांना सांगितला की मला ऑडिशनला जाण्याची इच्छा आहे. त्यावर लगेच माझे वडील मला आणि माझ्या बहिणीला वैशालीला दादरला ऑडिशनसाठी घेऊन गेले. तिथे माझं सिलेक्शन झालं. या साऱ्यामध्ये वैशालीने काही फॉलोअप घेतला नाही. मात्र मी सतत फॉलोअप घेत राहिले. त्यामुळे मी कायम या ग्रुपचा एक भाग म्हणून राहिले. त्याच्यापुढे मग मी स्टेट्सची नाटकंही केली”, असं किशोरी यांनी सांगितलं.

पुढे त्या म्हणतात, “स्टेट्सची नाटकं करत असताना वामन केंद्रे यांनी डायरेक्ट केलेल्या शतुरमुर्ग या हिंदी नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर शिवदास गोडके यांनी डायरेक्ट केलेलं महाभोजन तिरव्याचे हे नाटक पदरात पडलं. यापुढे माझा कलाविश्वातील प्रवास सुरु झाला. मग मोरुची मावशी आणि तत्सम व्यावसायिक नाटकं सुरु झाली आणि मी या फिल्डरमध्ये टिकून राहिले”.

दरम्यान, किशोरी शहाणे यांनी ‘वाजवा रे वाजवा’, ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यासोबतच अनेक लोकप्रिय मालिका आणि नाटकांमध्येही त्या झळकल्या आहेत.