‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात कोणकोणते स्पर्धक सहभागी होतील याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. ‘कलर्स मराठी’च्या ट्विटर अकाऊंटवर गेल्या काही दिवसांत प्रोमो प्रदर्शित करण्यात आले होते. यामध्ये काही स्पर्धकांची अप्रत्यक्षरित्या माहिती देण्यात आली होती. आता ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण जाणार आहेत याची संभाव्य यादी समोर आली आहे.

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने स्पर्धकांची संभाव्य यादी सांगितली आहे. यामध्ये लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेता मिलिंद शिंदे, कवी मनाचे नेते म्हणून ओळखले जाणारे अभिजीत बिचुकले, अभिनेत्री रसिका सुनील, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेत्री केतकी चितळे किंवा गायिका केतकी माटेगांवकर, अभिनेत्री अमृता देशमुख टिकटॉक गर्ल, अभिनेता दिगंबर नाईक, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री नेहा पेंडसे किंवा नेहा गद्रे किंवा नेहा शितोळे ही नावं चर्चेत आहेत. या यादीत एका महिला किर्तनकारचाही समावेश असेल. पण त्या नेमक्या कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या सर्व स्पर्धकांना १४ मे रोजी बिग बॉसच्या घरात नेण्यात येणार आहे. त्यानंतर १७ मे रोजी शूटिंगला सुरुवात आहे आणि १९ मे रोजी ‘बिग बॉस मराठी २’चा पहिला एपिसोड प्रसारित होईल.