‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाचा ग्रँड फिनाले अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हा शो सुरुवातीपासून विविध कारणांमुळे चर्चेत राहिला. ऐनवेळी यामध्ये ट्विस्ट आणत शर्मिष्ठा बाद झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. त्यापैकी मेघा धाडे विजेती ठरणार असंच अनेकांचं मत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील तिखट मिरची अर्थात मेघानं आपला खेळ उत्तमरित्या खेळत घरात स्वत:चं स्थान टिकून ठेवलं आहे. त्यामुळे मेघाच १०० टक्के विजेती ठरणार असा विश्वास तिच्या पतीनं व्यक्त केला आहे.
‘मला १०० टक्के खात्री आहे की मेघाच जिंकणार आणि त्याबद्दल काही शंका नाही. मी इंजीनिअर आहे. माझी पत्नी आहे म्हणून मी तीच जिंकेल असं म्हणत नाही आहे तर एकंदरीत आजपर्यंतचा खेळ आणि लोकांचा कल याचा विचार करून मी हा विश्वास व्यक्त करत आहे,’ असं आदित्य पावस्करने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
Bigg Boss Marathi : ‘ग्रँड फिनाले’मधून शर्मिष्ठा राऊत बाहेर?
बिग बॉस मराठीच्या घरात मेघा ज्याप्रकारे वावरत आहे, ती खऱ्या आयुष्आतही तशीच आहे. बिग बॉसच्या घरात कोणीच खोटं नाही वागू शकत. तिचं वागणं खोटं आहे असा आरोप सई आणि पुष्कर यांनी केला आहे. पण ती खऱ्या आयुष्यात कशी आहे हे त्यांना कुठे ठाऊक आहे? शोच्या सुरुवातीपासून ती जशी आहे तशीच आतापण आहे. त्याउलट घरातील इतर स्पर्धकांचं वागणं नेहमीच बदलल्याचं पाहायला मिळालं, असं देखील तो म्हणाला.
मेघाच्या स्वभावाविषयी सांगताना भावनेच्या भरात निर्णय घेणे ही तिची सर्वांत मोठी चूक असल्याचंही आदित्य म्हणतो. ‘आस्ताद आणि पुष्करची मैत्रीखातर साथ देणं ही तिची सर्वांत मोठी चूक आहे. त्या दोघांना पाठीशी घातल्यानेच ती अडचणीत आली,’ असंही तो म्हणतो.