‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्याच पर्वात सर्वाधिक चर्चेत राहिलेली सेलिब्रिटी म्हणजे रेशम टिपणीस. ‘बिग बॉस’च्या घरात जाणारी रेशम ही पहिली स्पर्धक होती. ९० दिवस या घरात बऱ्याच आव्हानांना तोंड दिल्यानंतर अखेर काल (रविवारी) ती घरातून बाहेर पडली आणि सर्वांनाच धक्का बसला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासून रेशम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहिली. मग ते एखाद्या टास्कमुळे असो किंवा सई आणि मेघामधील भांडणामुळे असो. आता बिग बॉसची स्पर्धा अंतिम टप्प्यावर आली असताना रेशम बाद झाली आणि यासाठी तिची एक चूक महागात पडल्याचं म्हटलं जात आहे.

शर्मिष्ठासाठी बैलगाडीचा टास्क न खेळणं किंवा त्यातून माघार घेणं रेशमला चांगलंच महागात पडलं. प्रेक्षक मला वाचवतील या अपेक्षेने ती आणि आस्ताद बैलगाडीतच बसून राहिले. टास्कच्या नियमानुसार दोघेही चुकले आणि त्याचा फटका रेशमला बसला. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रत्येक गोष्टीत आक्रमक भूमिका घेणारी रेशम अखेरीस अतिआत्मविश्वासाने मवाळ झाल्याचं पाहायला मिळालं.

घरातून बाहेर पडल्यावर रेशम टिपणीसला बिग बॉसने एक खास अधिकार दिला ज्यानुसार कोणत्याही एका सदस्याला ती नॉमिनेशनपासून वाचवू शकत होती. या अधिकाराचा वापर करत तिने आस्ताद काळेला सुरक्षित केले. त्यामुळे आस्ताद बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा दुसरा स्पर्धक ठरला. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेमध्ये पाच स्पर्धक जाणार असल्याने आता कोणता सदस्य बाद होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.