‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागला आहे. दर दिवशी या घरात नवीन काय घडामोडी होतील, कोणामध्ये वाद होतील याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण होते. कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉसच्या स्पर्धकांची आजच्या दिवसाची सुरूवात ‘सावधान सावधान वणवा पेट घेत आहे,’ या गाण्याने होणार आहे. आदल्या दिवशी ‘खुर्ची सम्राट’ या खेळावरून घरात बरीच भांडणं झाली. स्पर्धकांमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. टीम रेशम विरुद्धा टीम आस्ताद असे जरी खेळाचे दोन गट असले तरी रेशमच्या टीममधील स्पर्धकांनी आस्तादला वगळता इतर सर्व स्पर्धकांवर नाराजी व्यक्त केली. या खेळाच्या माध्यमातून काल या सर्व स्पर्धकांची वेगळी रुपं प्रेक्षकांसमोर आली असंही म्हणायला हरकत नाही.

घरातील सदस्यांची ही नाराजी बघता आऊ म्हणजेच उषा नाडकर्णींनी सर्वांची माफी मागितली. सई लोकूरला टीम रेशमची तिच्याप्रती असलेली वागणूक अजिबात आवडली नाही. या खेळानंतर घरात दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. आस्ताद, रेशम, राजेश, भूषण, विनीत आणि सुशांत यांचा एक गट तर मेघा, उषा, पुष्कर, सई आणि ऋतुजा यांचा दुसरा गट. आता विनीत आणि अनिल थत्ते नक्की कोणत्या गटात आहेत किंवा त्यांना कोणता गट आपलसं करेल हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच.

आज पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात ‘खुर्ची सम्राट’ हा खेळ रंगणार आहे. परंतु, आज टीम आस्ताद खुर्चीवर बसणार असून टीम रेशम त्यांना खुर्चीवरून उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. हा खेळ सुरू असताना टीम रेशम कालच्या गोष्टींचा बदला घेणार की संयमाने खेळणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यामध्ये टीम आस्तादने टीम रेशमपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खुर्चीवर बसून राहणं अनिवार्य असणार आहे. खेळाच्या शेवटपर्यंत टीम आस्तादमधील किमान एक तरी सदस्य त्या खुर्चीवर बसणं महत्वाचं असणार आहे आणि असं झाल्यास ती टीम विजयी ठरणार आहे.

आता नक्की कोणती टीम जिंकणार? कोण कोणावर मात करणार? मेघाला या खेळातून का बाहेर काढलं? या टास्क दरम्यान जुई– स्मितामध्ये कशावरून भांडण झालं? मेघाला का रडू आलं? टास्क दरम्यान कोण चक्कर येऊन पडलं? आस्तादने मेघावर नाराजी का व्यक्त केली?, या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या भागात प्रेक्षकांना मिळतील.

Story img Loader