भारतीय चित्रपट प्रेक्षकांच्या बदलत्या दृष्टिकोनानुसार बॉलिवूड चित्रपटसुद्धा बदलत आहेत. स्टार आणि अभिनेता यामध्ये एक स्पष्ट सीमारेषा असून दोघांचाही वेगळा असा चाहतावर्ग आहे. एकीकडे शाहरुख खान, रणवीर सिंग यांसारख्या कलाकारांना चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळत असताना दुसरीकडे राजकुमार रावसारखा अभिनेता इंडस्ट्रीत निश्चितपणे आपली एक वेगळी जागा निर्माण करताना दिसतोय. राजकुमारचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त या ३३ वर्षीय अभिनेत्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात…

३१ ऑगस्ट १९८४ रोजी गुरुग्रामच्या अहीरवाल येथे राजकुमार रावचा जन्म झाला. ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ FTII मधून पदवी घेतल्यानंतर तो मुंबईला आला. लहानपणापासूनच बॉलिवूड अभिनेत्यांची नक्कल करायला त्याला खूप आवडायचं. अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईला आल्यानंतर अनेकांप्रमाणे त्यालाही चित्रपट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. ‘माझा संघर्ष काही वेगळा नव्हता. पहिला चित्रपट मिळवणे हे खूप कठीण असतं कारण दररोज अनेकजण अभिनेता होण्याचं स्वप्न घेऊन या शहरात येत असतात. मी रोज वेगवेगळ्या दिग्दर्शकांना भेटायचो आणि त्यांच्याकडे काम मागायचो. अखेर एके दिवशी माझी नजर एका जाहिरातीवर गेली. दिवाकर बॅनर्जी यांना आपल्या चित्रपटासाठी एक नवा चेहरा हवा होता, अशी ही जाहिरात होती. ऑडिशनमध्ये माझी निवड झाली आणि ‘लव्ह, सेक्स और धोका’ हा पहिला चित्रपट मिळाला,’ असं तो म्हणतो. अनेकांप्रमाणे राजकुमारलाही सुरुवातीला नकाराला सामोरं जावं लागलं. मात्र सध्या खरा संघर्ष हा योग्य पटकथा निवडण्याचा असतो असंही तो म्हणतो.

‘सिटी लाईट्स’ या चित्रपटातील राजकुमारची सहअभिनेत्री पत्रलेखा गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘एफटीआयआय’मध्येच दोघांची पहिल्यांदा भेट झालेली आणि एका शॉर्ट फिल्मच्या सेटवर दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

PHOTOS : सुशांत आणि सारा शूटिंगपूर्वी केदारनाथ मंदिरात नतमस्तक

आपल्या प्रत्येक भूमिकेत जिवंतपणा आणणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार सध्या दोन महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्सवर काम करतोय. २२ सप्टेंबर रोजी त्याचा ‘न्यूटन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचबरोबर ‘बोस डेड ऑर अलाइव्ह’ या वेब सीरीजमध्ये तो सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारणार आहे.