लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना, कामगारांना त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवण्याचं काम करणाऱ्या अभिनेता सोनू सूदला राजकारण्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ या वृत्तपत्रातील लेखातून सोनू सूदच्या कामगिरीला अप्रत्यक्षपणे भाजपाचा पाठींबा असल्याचा संशय व्यक्त केला होता. यावर आता भाजपा प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी सोनू सूदला खुलं पत्र लिहित माफी मागितली आहे. ‘आम्हा राजकारण्यांमध्ये आता माणुसकी उरली नाही’, असं म्हणत सोनू सूदच्या कामगिरीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे पत्र?

‘मला माफ कर कारण मीसुद्धा या राजकीय व्यवस्थेचा एक भाग आहे. ही व्यवस्था प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करते. चांगल्या गोष्टीतही वाईट बघण्याची ही वृत्ती आहे. मला आठवतंय, स्थलांतरितांच्या वेदनांबद्दल तू बोलत होतास. भुकेल्या मुलाला कडेकर उचलून मैलोनमैल चालणाऱ्या माऊलीला पाहून तुझे डोळे पाणवले होते. मला माफ कर, आम्हा राजकारण्यांमध्ये माणुसकी उरली नाही. आम्ही लोकांमध्ये त्यांचा जीव पाहत नाही, तर मतदार म्हणून त्यांचा आकडा मोजतो. आम्हाला लोकांच्या संवेदनशीलतेचा राग येतो, कारण आमच्यातील संवेदनशीलतेला आम्ही खूप आधीच मारून टाकलंय. स्थलांतरित मजुरांचा रंग, धर्म, जात न बघता तू त्यांची मदत केलीस. हे आम्ही एकवेळ विसरू पण तू कोणाची भेट घेतलीस हे विसरणार नाही. राज्यपाल तुला काय म्हणाले, हे ‘सामना’ला माहित आहे, पण या स्थलांतरितांकडून तुला आलेल्या हजारों मेसेजवर पडदा टाकतील.

एक व्यक्ती बदल घडवून आणू शकतो हे तू सिद्ध केलंस आणि ते बदल घडवण्यासाठी त्या व्यक्तीला मुख्यमंत्री असण्याची गरज नाही. तुझ्यासारखे लोक देशाला प्राधान्य देतात. तू खरा हिरो आहेस.’

सोनू सूदनेही या पत्रावर प्रतिक्रिया दिली. ‘आज वाचलेली ही सर्वांत सुंदर गोष्ट आहे. थेट तुमच्या मनातून भावना यात व्यक्त केल्या आहेत. धन्यवाद’, असं त्याने ट्विटरवर लिहिलं.

संजय राऊत यांनी सोनूच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर सोनू सूदने रविवारी रात्री ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. भाजपाने लॉकडाउनच्या काळात सोनू सूदचा वापरत तर केला नाही ना? असा सवाल करताना काही दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातूनही सोनू सूदच्या कार्याचा उल्लेख पहायला मिळेल असे मत त्यांनी मांडले होते.

Story img Loader