‘पद्मावती’ चित्रपटाला होत असलेला विरोध काही शमताना दिसत नाही. कर्णी सेना, राजपूत संघटना यांनी या चित्रपटाला विरोध केल्यानंतर आता भाजपच्या खासदाराने लोकांना हा चित्रपट न पाहण्याचे आवाहन केले आहे. मात्र या चित्रपटावर टीका करताना भाजप खासदार चिंतामणी मालवीय यांनी पातळी सोडली आहे. ‘चित्रपटसृष्टीतील लोक आज एका पत्नीला सोडून उद्या दुसरीकडे जातात. ज्यांच्या पत्नी दररोज शौहर बदलतात, त्यांच्यासाठी जौहरची कल्पना अवघड आहे,’ असे वादग्रस्त विधान मालवीय यांनी केले आहे.

मध्य प्रदेशच्या उज्जैनचे खासदार असलेल्या चिंतामणी मालवीय यांनी ‘पद्मावती’ चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. ‘थोड्याफार पैशांसाठी इतिहासाची मोडतोड करुन चित्रपटाची निर्मिती करणे अतिशय लज्जास्पद आहे. ही बाब अतिशय चीड आणणारी आहे. इतिहासाची केली जाणारी मोडतोड कदापि सहन केली जाणार नाही,’ असा इशारा मालवीय यांनी दिला आहे. याशिवाय ‘भन्साळीसारख्या लोकांना दुसरी कोणतीही भाषा समजत नाही. त्यांना फक्त चपलांची भाषा समजते,’ असेही मालवीय यांनी म्हटले. लोकांनी हा चित्रपट पाहू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

‘राणी पद्मावती सर्व भारतीय स्त्रियांसाठी आदर्श आहे. प्रत्येक भारतीय व्यक्तीला राणी पद्मावतीचा अभिमान आहे. देश आणि समाजाच्या सन्मानासाठी राणी पद्मावतीने हजारो महिलांच्या साथीने स्वत:ला आगीत झोकून दिले. मात्र हा इतिहास तोडून मोडून दाखवणे देशाचा अपमान आहे. देशाच्या गौरवशाली इतिहासाशी केली जाणारी छेडछाड अजिबात सहन केली जाणार नाही,’ असेही मालवीय यांनी म्हटले.

‘अलाउद्दीन खिल्जीच्या दरबारातील कवींनी लिहिलेल्या चुकीच्या इतिहासावर संजय लीला भन्साळींनी चित्रपट तयार केला आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ चुकीचा नसून तो अतिशय निंदनीय आहे. अभिव्यक्तीच्या नावाखाली भन्साळींची मानसिक विकृती सहन केली जाणार नाही,’ असेही ते म्हणाले. याआधी कर्णी सेनेने ‘पद्मावती’ चित्रपटाला विरोध केला होता. याशिवाय गुजरातमध्ये निवडणूक होईपर्यंत चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. ‘पद्मावती’ चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

Story img Loader