शाहिरी जलशाच्या शैलीत समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकानं एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या नाटकाचा ७०० वा प्रयोग लवकरच २१ मे रोजी मुंबईतील यशवंतराव नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या प्रयोगाला बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित राहणार आहेत.

आमिर आणि नागराज मंजुळे या दोघांचीही उपस्थिती असल्यामुळे नाटकाच्या कलाकारांमध्येही वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. सारा एंटरटेन्मेंट, रंगमळा आणि विद्रोही शाहिरी जलसा यांनी हा प्रयोग आयोजित केला आहे. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक २०१२ मध्ये रंगभूमीवर आलं होतं. त्यानंतरच्या सहा वर्षांत या नाटकानं ७०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. राजकुमार तांगडे यांनी लिखित या नाटकाचं दिग्दर्शन नंदू माधव यांनी केलं आहे. कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, संभाजी तांगडे, प्रवीण डाळींबकर, अश्विनी भालेकर, मधुकर बिडवे, राजू सावंत, श्रावणी तांगडे आदींच्या यात भूमिका आहेत. नाटकाची संकल्पना, गीत, संगीत शाहीर संभाजी भगत यांचं आहे. या नाटकानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून कशा पद्धतीनं राजकारण केलं जातं, या स्फोटक विषयावर अतिशय संयत आणि विचारपूर्वक भाष्य केलं आहे.

वाचा : IPL 2018 – शिक्षणासाठी मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूने सोडलं क्रिकेट

‘कोणत्याही नाटकाचे ७०० प्रयोग होणं ही आनंदाची बाब आहे. आमच्या टीमनं केलेल्या कष्टांची ही परिणिती आहे. त्यातही या ७०० व्या प्रयोगाला आमिर खान आणि नागराज मंजुळे यांच्यासारखे संवेदनशील कलाकार उपस्थित राहणार आहेत, याचा विशेष आनंद आहे,’ असं निर्माता भगवान मेदनकर यांनी सांगितलं.