अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाबद्दल फक्त प्रेक्षकांनाच नाही तर, देशाच्या पंतप्रधानानांनाही उत्सुकता लागून राहीली होती. ज्या चित्रपटाचं नाव ऐकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरही हसू आलं होतं अशा चित्रपटाचं कथानक नेमकं कसं असणार याबाबतचे अनेक तर्क लावण्याचा प्रयत्न सर्वांनी केला. स्वच्छता, शौचालयं याभोवती चित्रपटाचं मसालेदार कथानक नेमकं कसं फिरणार याचंच कुतूहल पाहायला मिळत होतं. अशाच धमाल वातावरणात खिलाडी कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सामाजिक संदेश देणारा आणि त्याला मनोरंनाची जोड असणारा असाच हा परफेक्ट ट्रेलर आहे. या चित्रपटामध्ये अक्षय एका सर्वसामान्य व्यक्तीच्या भूमिकेत दिसत असल्यामुळे तो प्रत्येकाशी जोडला गेला आहे हे ट्रेलर पाहताना जाणवतं. त्याशिवाय शौचालय आणि त्याच्याभोवची फिरणारं कथानंक हाताळताना उगाचच भाषेची हेळसांड न करता तितक्याच कलात्मकपणे विनोदी शैलीतून काही महत्त्वाचे संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
अक्षय आणि भूमीच्या वैवाहिक जीवनात शौचालयाच्या अभावी कसा दुरावा येतो इथपासून सुरु झालेला प्रवास कशा प्रकारे एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालतो याची सुरेख झलक ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. अक्षय आणि भूमीसोबतच चित्रपटातील इतर कलाकारही प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. त्यामुळे कलाकारांची ही ‘लोटा पार्टी’ तिकीटबारीवर किती कमाई करते याबाबतचे अंदाज वर्तवण्यास आता सुरुवात झाल्याचं मिळत आहे.
A love that started a revolution! Here's the #ToiletEkPremKathaTrailer @ToiletTheFilm @psbhumi https://t.co/6XAnZgBTEa
— Akshay Kumar (@akshaykumar) June 11, 2017
चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यापूर्वी खिलाडी कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाचं शक्य त्या सर्व परिने प्रमोशन करण्यास सुरुवात केली होती. विविध पोस्टर्स आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून त्याने ‘टॉयलेट….’ हा चित्रपट सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरात त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहता खिलाडी कुमारचा हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर गाजणार अशीच चिन्हं आहेत. दरम्यान, नेहमीच हटके कथानकांना न्याय देणारा हा अभिनेता या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत स्क्रीन शेअर करत आहे. त्यामुळे खिलाडी कुमार आणि भूमीची देसी केमिस्ट्री पाहण्यासाठीसुद्धा प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
वाचा : तनुश्री दत्ताने या ‘वंडर वूमन’ला हरवलंय
श्री नारायण सिंग दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी शाहरूख खानच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटासोबत अक्षयचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण, किंग खान आणि खिलाडी कुमारमध्ये होणारी ही टक्कर आता टळली असून शाहरुखचा चित्रपट ७ दिवसांपूर्वीच म्हणजे ४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.