चौकटीबाहेरच्या विषयांना रुपेरी पडद्यावर मोठ्या ताकदीने मांडणारा अभिनेता अक्षय कुमार लवकरच ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणाऱ्या ‘पॅडमॅन’च्या प्रसिद्धीसाठी तो सध्या काही कार्यक्रमांनाही हजेरी लावतोय. अशाच एका कार्यक्रमाला गेला असता खिलाडी कुमारला एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. मासिक पाळी आणि समाजात न्यूनगंड असणाऱ्या विषयांबद्दल मुलाशी म्हणजेच आरवशी तू खुलेपणाने चर्चा करतोस का, असा प्रश्न त्याला करण्यात आला.

महत्त्वाच्या विषयावरील या प्रश्नाचे उत्तर देत यावेळी अक्षयने अनेकांची मनं जिंकली. चित्रपटांच्या माध्यमातून फक्त प्रेक्षकांमध्येच काही महत्त्वाच्या मुद्द्याविषयी आपण जनजागृती करत नाही, तर कुटुंबातही या मुद्द्यावर अगदी खुलेपणाने चर्चा केली जात असल्याचे त्याने स्पष्ट केले. याविषयीच सांगत तो म्हणाला, ‘ट्विंकलने आरवला मासिक पाळी आणि अशा इतरही विषयांबद्दल सर्व माहिती दिली आहे. या विषयांवर मुलांशी चर्चा होणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. त्यात लाज वाटण्याचा प्रश्नच येत नाही. आरवपासून आम्ही काहीही लपवले नाही.’
मासिक पाळी, शारीरिक बदल या सर्व गोष्टींविषयी समाजात असणारे चुकीचे समज, न्यूनगंड या सर्व गोष्टी बदलण्याची प्रकर्षाने गरज असल्याचा मुद्दाही त्याने यावेळी मांडला. मला माझ्या मुलांपासून काहीच लपवायचे नाहीये. मुळात इतरांनाही मी हीच गोष्ट सांगतोय, असे म्हणत अक्षयने त्याच्याच अंदाजात या विषयीची भूमिका स्पष्ट केली.

वाचा : सॅनिटरी नॅपकिन्सला आपलं म्हणा- अक्षय कुमार

आर. बाल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून अक्षय पुन्हा एकदा आव्हानात्मक पण तितकीच प्रभावी भूमिका साकारत असून, त्याचे हे वेगळे रुप पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळतेय. ग्रामीण भागातील महिलांना मासिक पाळीदरम्यान ज्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात येणार आहे. खेडेगावातील महिलांच्या याच अडचणी ओळखून त्यांना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देणाऱ्या अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्या कार्यावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

Story img Loader