कोणत्याही चित्रपटातील मुख्य भूमिका साकारण्यासाठी खिलाडी कुमारच्या नावाची वर्णी लागल्यावर अनेकांना हेवा वाटतो. अक्षय ज्या ताकदीने एखादे पात्र साकारण्यासाठी मेहनत घेतो ते पाहता त्याची प्रशंसाही केली जाते. पण, चित्रपटाच्या बाबतीत सर्व काही ठरल्याप्रमाणेच होते असे नाही. इतर सर्व कलाकारांप्रमाणेच खिलाडी कुमारलाही मतभेदांचा सामना करावा लागतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या आगामी चित्रपटाच्या बाबतीतही असाच पेच उदभवला असून, ‘मोगुल’ या चित्रपटातून अक्षयने काढता पाय घेतला आहे.
‘टी सीरिज’चे सर्वेसर्वा दिवंगत गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपटातून खिलाडी कुमार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार होता. काही महिन्यांपूर्वी त्याने या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअरही केला होता. पण, आता मात्र दिग्दर्शकाने अक्षयच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच त्याने हा निर्णय घेतल्याचे कळते. ‘मिड-डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अक्षयने चित्रपटाच्या स्क्रीप्टमध्ये काही बदल सुचवत ठराविक गोष्टी पुन्हा लिहिण्यास सांगितले होते. पण, त्याच्या म्हणण्याकडे दिग्दर्शक सुभाष कपूरने पूर्णपणे दुर्लक्ष केले. दिग्दर्शकासोबत झालेल्या या मतभेदांमुळेच अखेर अक्षयने चित्रपटातून काढता पाय घेण्याचा पर्याय निवडला.
वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?
अक्षयने चित्रपटाशी संलग्न व्यक्तींना अद्याप याबाबतची अधिकृत माहिती दिली नसल्याचे कळते. त्यामुळे आता आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असलेला खिलाडी कुमार याबाबत काय प्रतिक्रिया देतो याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. अक्षय आणि दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी यापूर्वी ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाच्या वेळी एकत्र काम केले होते. तेव्हा आता चर्चा करुन या दोघांमध्ये असलेले मतभेद दूर होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, पुढच्या वर्षीच्या काही बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या यादीत ‘मोगुल’चाही समावेश होता. त्यामुळे आता या समस्येवर काही तोडगा निघतो का, चित्रपटाविषयी पुढे कोणती अधिकृत घोषणा होते, याकडेच अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.