चित्रपटाच्या निमित्ताने नवनवीन विषय हाताळत आणि काही चौकटीबाहेरील विषयांना न्याय देत अभिनेता अक्षय कुमार नेहमीच प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटामुळे तो चाहत्यांची मनं जिंकून गेला आहे. समीक्षकांनी या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद दिला असला तरीही मासिक पाळी आणि त्याभोवती फिरणाऱ्या कथानकाची निवड करणं हीच धाडसाची गोष्ट असल्याचं म्हणत प्रेक्षकांनी ‘पॅडमॅन’च्या बाजूने कौल दिला. भारतात बॉक्स ऑफिसवर समानाधानकारक कमाई करणाऱ्या या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये मात्र बंदी घालण्यात आली आहे.

‘संस्कृती आणि परंपरांच्या विरोधात जाणारं कथानक हाताळणाऱ्या चित्रपटांवर आम्ही बंदी घालत असून, वितरकांनाही त्याविषयीचा इशारा देण्यात आला आहे’, असं पाकिस्तानचे फेडरल सेन्सॉर बोर्ड सदस्य इशाक अहमद म्हणाल्याचं वृत्त ‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रसिद्ध केलं. पंजाब सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनीही खिलाडी कुमारच्या या चित्रपटाच्या कथानकावर आक्षेप घेत चित्रपटाला प्रमाणित करण्यास नकार दिला.

वाचा : Padman Movie Review : सुरुवातीला भरकटणारा, पण क्षणार्धात सूर पकडणारा ‘पॅडमॅन’

‘समाजात न्यूनगंड असणाऱ्या विषयाला हाताळणारे चित्रपट आम्ही इथे दाखवणार नाही. हे आमच्या संस्कृती आणि धर्माच्या विरोधात जाण्यासारखं आहे’, असं मत त्या सदस्यांनी मांडलं. तेव्हा आता येत्या काळात पाकिस्तानातील वितरक ‘पॅडमॅन’ चित्रपटाच्या कथानकाचं महत्त्वं आणि त्याची प्रगल्भता लक्षात घेत चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.