यंदाचं वर्ष अभिनेता अक्षय कुमारसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे असंच म्हणावं लागेल. ‘गोल्ड’ आणि ‘२.०’ यांसारख्या बिग बजेट चित्रपटांच्या माध्यमातून हा खिलाडी कुमार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांव्यतिरिक्त ‘केसरी’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणालाही तो पुरेसा वेळ देत आहे. पण, या साऱ्यात तो आपल्या कुटुंबाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्याही पार पाडत आहे. कामाच्या व्यापातही शक्य तेव्हा कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणाऱ्या खिलाडी कुमारच्या या वृत्तीचा अनेकांनाच हेवा वाटतो. तर, त्याच्या पत्नीला म्हणजेच अभिनेत्री, लेखिका ट्विंकल खन्नाला त्याचा अभिमान वाटतो.

ट्विंकने नुकताच पोस्ट केलेला फोटो पाहून ही गोष्ट लगेचच लक्षात येतेय. कामाचा ताण आणि रोजचं धकाधकीचं आयुष्य या साऱ्या व्यापातही काही लहानसहान गोष्टीसुद्धा आपल्या जवळच्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद खुलवून जातात. त्यामुळे खिलाडी कुमारनेही ट्विंकलसाठी असाच एक बेत आखला होता. सहसा एकमेकांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी काही जोड्या लाँग ड्राईव्हला प्राधान्य देतात. खिलाडी कुमारनेही असाच एक बेत आखला खरा. पण, तोही थोडा वेगळ्या पद्धतीनेच.

वाचा : राधिका आपटेला का करावा लागला फोन सेक्स?

रविवारी पहाटे लवकरच अक्षय ट्विंकलला रिक्षा ड्राइव्हवर घेऊन गेला होता. खुद्द ट्विंकलनेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो पोस्ट करत अक्षयचा उल्लेख ‘क्यूट रिक्षा ड्राइव्हर’ असा केला. या निमित्ताने चाहत्यांनाही रिअल लाइफ जोडीची केमिस्ट्री पुन्हा एकदा सर्वांनाच पाहायला मिळाली. ट्विंकलने पोस्ट केलेल्या या फोटोला अनेकांनीच लाइक केलं असून, त्याच्या कमेंट बॉक्समध्येही मिस्टर अँड मिसेस खिलाडीचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. ट्विंकल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. ती नेहमीच काही धमाल फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. अशातच तिने पोस्ट केलेला हा फोटो सध्या चर्चेत आहे.